पालघर जिल्ह्यामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्पांची संख्या 13 आहे. एकूण अंगणवाडी मुळ केंद्राची संख्या 2579 असून मिनी अंगणवाडी केंद्राची संख्या 604 आहे. या प्रकल्पांतर्गत पुरक पोषण आहाराचा लाभ दिलेले लाभार्थी माहे जुलै 2017 अखेर 7 महिने ते 6 वर्ष एकूण लाभार्थी 1 लाख 53 हजार 324 आहे. गरोदर माता 11 हजार 432 आहेत. स्तनदा माता 12 हजार 249 आहेत तर किशोरवयीन मुली 8 हजार 439 आहेत.
महिला व बालविकास विभागामार्फत गरोदर मातांची अंगणवाडीच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करणे, अंगणवाडी कार्यकर्ती सातत्याने गृहभेटीद्वारे मातेचे समुपदेशन करणे (स्वच्छता व आरोग्य इत्यादी), वजन, एचबी, बीएमआय, आहाराविषयक मार्गदर्शन करणे, गरोदर मातांना Foilic Acid च्या गोळ्या पुरविणे, मातेचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करणे, प्रसुती आरोग्य केंद्रात करण्यासाठी प्रवृत्त करणे, घरपोच पोषण आहार (THR) पुरविणे, नोंदणी झाल्यापासून अमृत आहार योजनेंतर्गत एक वेळ चौरस आहार पुरविणे, जोखमीच्या मातांकडे विशेष लक्ष देऊन उपचारास प्रवृत्त करणे या सेवा देण्यात येतात. स्तनदा मातांना अंगणवाडी कार्यकर्ती मार्फत चिकाच्या दुधाचे महत्त्व अमृतासमान पटवून देणे, पहिले सहा महिने निव्वळ स्तनपान बाबत जागृती करणे, स्तनपान सप्ताह साजरा करणे, मातेच्या व बालकाच्या स्वच्छता, आरोग्य व आहाराबाबत मार्गदर्शन करणे, सहा महिन्यानंतर बालकास पुरक आहार पुरविणे, अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करणे, घरपोच पोषण आहार (THR) पुरविणे, बाळंतपणानंतर सहा महिन्यापर्यंत अमृत आहार अंतर्गत एक वेळ चौरस आहार पुरविणे या सेवा पुरविण्यात येतात. 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी कार्यकर्तीमार्फत बालकांचे वेळापत्रकानुसार लसीकरण करणे, बालकांचे श्रेणीकरण करणे, बालकाचे वेळोवेळी वजन, उंची, दंडघेर घेणे, अंगणवाडीमध्ये नोंद करणे, घरपोच पोषण आहार (THR) पुरविणे, अंगणवाडीत येणा-या बालकांना सकाळचा नाश्ता व दुपारचा गरम ताजा आहार पुरविणे, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा-2 अंतर्गत 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकास आठवड्यातून 4 वेळा प्रती दिन 1 उकडलेले अंडे अथवा 2 केळी पुरविणे, कुपोषित बालकांना संदर्भ सेवा देणे (पालकांचे समुपदेश, पाठपुरावा इत्यादी), तीव्र कुपोषित बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करणे, तीव्र कुपोषित बालकांकडे गृहभेटी देणे, अंगणवाडीतील बालकांना पुर्व प्राथमिक शिक्षण देणे इत्यादी सेवा या प्रकल्पाकडून पुरविल्या जातात.
अमृत आहार योजनेंतर्गत अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यामधील स्त्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र व जवळच्या अंगणवाडी/मिनी अंगणवाडीमध्ये नोंदणी झाल्यापासून गरोदर स्त्रियांना बाळंतपणापर्यंत व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर 6 महिने एक वेळा चौरस आहार देण्यासाठी रु.25/- प्रती लाभार्थी प्रमाणे निधी दिला जात आहे. एक वेळ चौरस आहार देण्यासठी येणारा प्रती लाभार्थी रु.25/- चा निधी हा पालघर जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ व आदिवासी क्षेत्र पाहता अपुरा असल्याचे दिसून आले. त्यामुळे एक वेळ चौरस आहार पुरविण्यासाठी प्रती लाभार्थी रु.10/- मात्र पुरक अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान जिल्हा परिषद निधीतून देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती आदिवासी उपयोजना मार्फत सन 2017-18 मध्ये ग्राम बाल विकास केंद्र चालू करण्यासाठी एकूण रुपये 339.84 लाख तरतूद करून दिलेली आहे. सदरची तरतूद गट स्तरावर उपलब्ध करून दिलेली असून ग्राम बाल विकास केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत.
जव्हारमधील बिट घिवंडा येथे जेएसडब्ल्यू राधाकृष्णा फुड सर्व्हिसमार्फत अतिरिक्त आहार पुरवठा करण्यात येतो. या आहारामध्ये डाळ खिचडी, सोया भात, पोहे, नाचणी लाडू, गहू, सतू, लाडू, चना, सतू लाडू यांचा समावेश असतो. सीएसआर सेल स्थापन करून त्यांच्यामार्फत जिल्हयातील सर्व अंगणवाडीतील बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा करण्यात येतो.
पालघर, वसई व डहाणू येथे ग्राममंगल संस्थेमार्फत वाडा व विक्रमगड येथे क्वेस्ट लर्निंग स्पेस यांच्यामार्फत पुर्व प्राथमिक शिक्षणाचे प्रशिक्षण बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांना देण्यात येते. अंगणवाडी सेविका/मदतनीस यांचे सातत्यपूर्ण पुर्व प्राथमिक शिक्षणाचे प्रशिक्षण, शिक्षण क्षेत्रात काम करणा-या सर्व संस्थामार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येते. ज्ञानरचनावाद शिक्षण जिल्ह्यातील अंगणवाडीमधील सर्व बालकांना देण्यात येते. जिल्हयातील बालके त्यांचे कुटूंबासमवेत पावसाळ्यानंतर रोजगारासाठी इतर जिल्ह्यांमध्ये/राज्यामध्ये स्थलांतरीत होतात. या काळात बालकांना पुरेसा आहार न मिळाल्यामुळे त्यांचे वजनात घट होते व परत आल्यानंतर ही बालके SAM/MAM श्रेणीमध्ये दाखल होतात. याकरीता पालघर जिल्हयातील CSR Cell निर्माण करून जिल्हयातील कुटूंबाचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवून भाजीपाला, शेळीपालन, गोधडी व्यवसाय, कुक्कूट पालन इत्यादी स्थानिक पुरक उद्योग व रोजगार निर्मिती करण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने प्रयत्न करण्यात येतात.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत भगतांची कार्यशाळा आयोजित करणे, सन 2015-16 मध्ये मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेली होती. या योजनेंतर्गत सन 2015-16 मध्ये एकूण 25 कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून एकूण 1 हजार 276 भगतांची कार्यशाळा घेण्यात आली होती. अनुसूचित क्षेत्रात बालविवाह, गरोदर काळात दुर्लक्ष, बालमृत्यू, मातामृत्यू, बालक आजारी पडल्यास स्थानिक भगतांकडून उपचार घेणे, मुलांच्या आरोग्य विषयक निर्णयात भगतांना महत्व देणे या बाबी आहेत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमांतर्गत भगतांचे बालविवाह प्रतिबंध, गरोदर स्तनदा मातेचे आरोग्य, कुपोषण, बालकांचे आरोग्य विषयक प्रश्न याबाबत सातत्याने प्रबोधन करण्यात येते. पालघर जिल्हा कुपोषण सहाय्यता निधी स्थापन करून त्याद्वारे जास्त MIW ( Medium Under Weight) व SUW ( Severe Under Weight) बालकांना अतिरिक्त आहार उपलब्ध करून देणे. अशाप्रकारे पालघर जिल्हा कुपोषणमुक्तीकडे वाटचाल करीत आहे.
****************
दत्तात्रय कोकरे
प्र.जिल्हा माहिती अधिकारी,
पालघर