स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक डॉ..ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जयंतीदिन “वाचना प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त दि.15 ऑक्टोबर 2017 रोजी ग्रंथप्रेम वाढीसाठी तसेच वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने “वाचना प्रेरणा दिन” निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतून “वाचाल तर वाचाल याचे मर्म जाणूया, ग्रंथभेट देऊन वाचन संस्कृती वाढवूया” या भूमिकेतून समाज विकास विभागातर्फे “पुस्तक भेट शिबिर” दि.15 ऑक्टोबर 2017 रोजी आयोजित करण्यात येत आहे. यानिमित्त नागरिकांनी वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपल्याकडील ग्रंथ / पुस्तके नवी मुंबई महानगरपालिकेच्या ग्रंथालयास स्नेहभेट म्हणून देण्याचे नियोजन आहे.
या पुस्तक भेट शिबिराचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सेक्टर 3 ए बेलापूर येथील मध्यवर्ती ग्रंथालय कै. गौरव म्हात्रे कला केंद्र व सार्वजनिक वाचनालय, सेक्टर 16 ए व 18 नेरूळ नमुंमपा शाळेजवळील मिनाताई ठाकरे भाजी मंडई येथील ग्रंथालय, सेक्टर 15 वाशी दत्तगुरु नगर येथील ग्रंथालय, तुर्भे विभाग कार्यालयाजवळील स्व. भोलानाथ पाटील सांस्कृतीक केंद्रातील ग्रंथालय तसेच सेक्टर 4 ऐरोली येथील छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदिरातील ग्रंथालय याठिकाणी करण्यात आले आहे. तरी पुस्तकप्रेमी नागरिकांनी 15 ऑक्टोबर 2017 रोजी वाजन प्रेरणादिनानिमित्त आपल्या संग्रहातील अथवा नवीन ग्रंथ / पुस्तके स्वयंस्फुर्तीने स्नेहभेट म्हणून द्यावीत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.