स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
पनवेल : खालचा ओवळा गावाचा दहा गाव समितीत समावेश करून त्याचे पुनर्वसन करावे, तसेच या गावाच्या जागेवर सिडकोने भराव करून नव्याने घरे बांधण्यास मदत करावी, अशी मागणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व खालचा ओवळा गावाच्या ग्रामस्थांनी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे सिडको भवनमधील बैठकीत केली.
खालचा ओवळा गावाला पूरग्रस्त म्हणून मान्यता देऊन त्याची उंची वाढवावी व त्यासाठी भरावही सिडकोने करावा, तसेच कमी उंचवरील सखल भागातील घरांचेही पुनर्वसन करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात खालचा ओवळा, वरचा ओवळा, उलवा, तरघर, कोंबडभुजे आणि गणेशपुरी या गावांच्या पुनर्वसनाबाबत सिडको भवनातील कार्यालयात झालेल्या बैठकीत सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे, मुख्य अभियंता राजन दाहीरकर, सिडकोचे सर्व वरिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता, ग्रामस्थांचे नेते आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
ओवळा गावाची नदी वळवण्यासाठी सिडकोने सादर केलेल्या प्रेझेंटेशनमुळे ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने पुन्हा पुणे येथून कागदपत्रे आणून ग्रामस्थांना त्या जागी जाऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि त्यांचे पूर्ण समाधान करण्यात यावे, असे ठरले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम करण्यास सिडकोला कोणीही विरोध केला नाही. विस्थापित गावांच्या अनेक समस्या आहेत.
वरचा ओवळा, उलवा, तरघर, कोंबडभुजे आणि गणेशपुरी या गावांचे पुनर्वसन जेथे करायचे आहे, तेथील भूखंड सिडकोने विकसित करून ताब्यात देण्याचे काम पनवेल येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह लोकनेते रामशेठ ठाकूर, जे. एम. म्हात्रे, सुनील म्हसकर, वरचा ओवळा गावाने ठरवून दिलेली १२ लोकांची पंच कमिटी, गायत्री कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर यांच्याबरोबर ठरल्याप्रमाणे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी तीन महिन्यांत त्या गावचे पुनर्वसन करण्याचे लेखी द्यावे आणि तशा प्रकारची कारवाई करावी, असा निर्णय करण्यात आला आहे.
——————————————————————————
मी केवळ १० टक्के ठेकेदार, १०० टक्के प्रकल्पग्रस्त!
मी केवळ १० टक्के ठेकेदार, तर १०० टक्के प्रकल्पग्रस्त आहे आणि प्रकल्पग्रस्त म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडणार आहे, असे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले, तसेच गाभा क्षेत्राच्या कामांच्या उद्घाटनवेळी झालेल्या घोषणाबाजीचा त्यांनी निषेध करून प्रकल्पग्रस्थांची दिशाभूल करणार्या राजकारण्यांवर निशाणा साधला. प्रकल्पग्रस्त गावातील गावकर्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर हे पुनर्वसनाच्या दृष्टीने स्वतःहून पुढाकार घेऊन काम करत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले.