स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात ॲम्फीथिएटरमध्ये महापौर श्री. सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी परिवहन समिती सभापती प्रदिप गवस, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, शहर अभियंता मोहन डगांवकर, घनकचरा विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, परवाना विभागाच्या उपआयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, सहा. संचालक नगररचना औवेस मोमिन, शिक्षणाधिकारी संदीप संगवे, परिवहन सदस्य समिर बागवान, राजेंद्र आव्हाड, कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार, संजय देसाई व अरविंद शिंदे उपस्थित होते.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येत असते. नवी मुंबई महानगरपालिकेने जयंतीचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतून 15 ऑक्टोबर रोजी “पुस्तक भेट शिबिरा” चे आयोजन केले आहे.
या निमित्त नागरिक आपल्या संग्रहातील अथवा नवीन पुस्तके / ग्रंथ नवी मुंबई महानगरपालिकेच्या ग्रंथालयास स्नेहभेट देऊन वाचन संस्कृती वाढीसाठी आपले योगदान देऊ शकतात. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिकेच्या सेक्टर 3 ए बेलापूर येथील मध्यवर्ती ग्रंथालय कै. गौरव म्हात्रे कला केंद्र व सार्वजनिक वाचनालय, सेक्टर 16 ए व 18 नेरूळ नमुंमपा शाळेजवळील मिनाताई ठाकरे भाजी मंडई येथील ग्रंथालय, सेक्टर 15 वाशी दत्तगुरु नगर येथील ग्रंथालय, तुर्भे विभाग कार्यालयाजवळील स्व. भोलानाथ पाटील सांस्कृतीक केंद्रातील ग्रंथालय तसेच सेक्टर 4 ऐरोली येथील छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदिरातील ग्रंथालय या 4 ग्रंथालयात आयोजित पुस्तक भेट शिबिराला आवर्जुन भेट देऊन 15 ऑक्टोबर 2017 या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपल्या संग्रहातील अथवा नवीन ग्रंथ / पुस्तके स्वयंस्फुर्तीने स्नेहभेट म्हणून द्यावीत असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांच्या वतीने करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्येही वाचन दिन साजरा होणार आहे.