दिपक देशमुख
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर दहामधील रेयॉन इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने आयबीचा पेपर सोडविण्याकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना ओएमआर शीट देण्यास तब्बल २० मिनिटाचा विलंब केला आणि विद्यार्थ्यांना सोडविण्याकरिता दिलेला पेपर मात्र वेळेवर काढून घेण्यात आला. यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून ५००च्या आसपास पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य रेयॉन शाळेच्या व्यवस्थापणाच्या गलथान कारभारामुळे टांगणीला लागले आहे.
आयबीच्या पेपरकरिता रविवारी (दि. १५ ऑक्टोबर) सानपाडा सेक्टर १० मधील रेयॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाचशेच्या आसपास विद्यार्थी आले होते. पेपर सकाळी १० वाजता असला तरी विद्यार्थी ८.३० वाजल्यापासून शाळेजवळ हजर होते. पेपरच्या अगोदर १५ मिनिटे ओएमआर शीट देणे आवश्यक असताना विद्यार्थ्यांना १० वाजून ०५ मिनिटांनी ओएमआर शीट देण्यात आली. ही शीट भरण्यातच विद्यार्थ्यांचे १० ते १५ मिनिटे गेली. शाळेकडून विद्यार्थ्यांकडून ११ वाजता पेपर काढून घेण्यात आला. ओएमआर शीट विलंबाने दिल्यामुळे पेपर पूर्ण सोडविणे शक्य झाले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे. विद्यार्थ्यांनी याबाबत शाळेच्या प्राचार्यांना संपर्क साधून विचारणा केली असता, प्राचार्यांनी पोलिसांना पाचारण करून विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढले. १५ मिनिटे ओएमआर शीटमुळे वाया गेल्यामुळे १०० गुणांचा पेपर सोडविता आला नाही. शाळेमुळे आपले भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने शाळेवर कारवाई करण्याची विद्यार्थ्यांची मागणी केली. आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत आपण राज्यपालाकडे तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे लेखी निवेदन देवून दाद मागणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
याबाबत शाळेची भूमिका जाणून घेण्याचा प्रयास केला असता, प्रवेशद्वारावर असलेल्या शालेय कर्मचार्यांनी बोलण्यास नकार दिला.