पंजाब राज्यातील लोकसभा पोटनिवडणूकीमध्ये कॉंग्रेसने भाजप उमेदवाराचा एक लाख ९० हजार पेक्षा अधिक मताधिक्क्याने पराभव केला. त्याअगोदर महाराष्ट्रात नांदेड महापालिकेच्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचा विजय झाला. सोशल मिडीयावर कार्यरत असणार्या तथाकथित रिकामटेकड्या राजकीय विश्लेषकांनी लगेचच आपले ज्ञान पाजळण्यास सुरूवात केली. मुळातच सोशल मिडीयाचा वापर हा माहिती देवाणघेवाणीसाठी अपेक्षित असताना दुदैर्वाने राजकीय चर्चासाठीच अधिक केला जात आहे. त्यातच व्हॉट्सअपवर ग्रुप बनवून त्याचे ऍडमिन पद भूषविणे आणि आपल्या कार्यक्षेत्रातील राजकीय घटकांना त्यात समाविष्ठ करून रात्र-दिवस राजकीय चर्चा झोडत बसणे अलिकडच्या काळात मोठा पुरूषार्थ होवू लागला आहे.
आपल्या देशामध्ये राजकारण आणि क्रिकेट हे असे दोन विषय असे आहेत की, ज्यामध्ये कोणाला फारसे समजत नसले तरी त्या विषयामध्ये कित्येक तास अकलेचे तारे तोडायची आम्हा भारतीयांची क्षमता असते. त्यातच आता व्हॉट्सअपची भर पडली आहे. आता इंटरनेटही स्वस्त झाले आहे. जिओच्या पुण्याईने व्हॉट्स अप माफियांची तर चंगळच झाली आहे. व्हॉट्स अप ग्रुप करून राजकीय चर्चा झोडत बसायच्या. आपल्या पक्षाच्या म्हणण्यापेक्षा आपल्या नेतेमंडळीचीच तळी उचलायची, उदोउदो करत बसायचा. आपल्या नेत्याबद्दल कोणी काही बोलले की लगेच नेत्याच्या निदर्शनास आणून द्यायचे असे उद्योग अलिकडच्या काळात वाढीस लागले आहेत. व्हॉट्सअप वेळ घालविणार्या या रिकामटेकड्या राजकीय चर्चा करणार्यांच्या मागे फारसा जनाधार असतो अथवा जनसामान्यांमध्ये त्यांची फारशी प्रतिमा चांगली असते, अशातलाही भाग नाही. ही मंडळी आपल्या नेत्याला स्वकर्तृत्वावर शंभर ते दोनशे मतेही मिळवून देवू शकत नाहीत आणि विशेष म्हणजे याची जाणिव त्या त्या पक्षाच्या राजकीय नेतेमंडळींनाही असते. पूर्वीच्या काळी पाटील, इनामदार मंडळी आपल्या वाड्याच्या समोरच दोन-चार धडधाकट माजटलेली कुत्री बांधून ठेवायची. या कुत्र्यांचे एकच काम असायचे, ते म्हणजे वाड्याच्या सभोवताली कुणी फिरकले तरी भुकूंन मालकाला सावध करायचे. पण आता काळ बदलला आहे. पाटील, इनामदारांची जागा राजकारण्यांनी घेतली आहे आणि त्यांच्या विरोधात सोशल मिडीयावर कोणी काही बोलले की त्याविरोधात कोल्हेकुई करण्यासाठी ठराविक कार्यकर्त्यांचा एक वर्ग अलिकडच्या काळात निर्माण झाला आहे. पूर्वीच्या काळात दारात भुंकणार्या कुत्र्यांना पाटील-इनामदार माजघर, बैठकीच्या खोल्या, स्वंयपाकघरामध्ये येवू देत नसत, तोच प्रकार आता कलीयुगातही घडू लागला आहे. सोशल मिडीयावर कार्यरत असणार्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे शंभर ते दोनशेचाही जनाधार नसल्याने निवडणूक काळात रणनीती ठरविताना या कार्यकर्त्यांना विश्वासात तर सोडा, पण साधे विचारातही घेतले जात नाही. कारण जनाधार असणारे, जनसामान्यांत वावरणारे कार्यकर्ते सोशल मिडीयावर सक्रिय नसतात, याची जाणिव राजकीय नेत्यांनाही असते. परंतु बाराही महिने सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांना मात्र स्वत:बद्दलच गैरसमज होवू लागला आहे की, आपल्या नेत्याची प्रतिमा आपणच सांभाळतो. पण तसे काही नसते. नेता आपली समीकरणे बरोबर मांडत असतो. सोशल मिडीयावर वावरणार्या कार्यकर्त्यांची अवस्था आजच्या काळात खरे सांगावयाचे झाल्यास बैलगाडीखाली चालणार्या कुत्र्यासारखी झालेली आहे. बैलगाडी चालूच असते, पण कुत्र्याचा गैरसमज असतो की गाडी आपल्याचमुळे चालत आहे.
पंजाबमधील एका जागेवरील पोटनिवडणूकीच्या निकालामुळे आणि नांदेड महानगरपालिकेच्या निकालामुळे भाजपला घरघर आणि कॉंग्रेसचे पुनरागमन असा जावई शोध लावत सोशल मिडीयावर पडीक असणार्या घटकांनी कोल्हेकुई करण्यास सुरूवात केली आहे. वास्तविक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांना अडीच वर्षाचा वेळ बाकी आहे. लोकसभेसोबतच देशातील विधानसभा निवडणूका एकत्रित घेण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू झाल्या आहेत. पण त्याबाबतचा निर्णय अद्यापि दृष्टीक्षेपात आलेला नाही.
सोशल मिडीयावर कार्यरत असणारे घटक स्वत:ला समाजसुधारक आणि विचारबंत समजू लागले आहेत. ज्याच्या त्याच्या बुध्दीमत्तेचा आणि आकलनशक्तिचा तो एक भाग आहे.
राज्यात भाजपाचे सव्वाशेच्या आसपास आमदार आहेत आणि केंद्रातही भाजपला स्पष्ट बहूमत आहे. एका महापालिकेच्या निकालावरून आणि एका लोकसभेच्या पोटनिवडणूक निकालावरून कोणाला भरती आणि कोणाला ओहोटी असा अंदाज बांधणे चुकीचे आहे. आजवर देशात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा अंदाज घेतल्यास आणि अभ्यास केल्यास निवडणूक काळातील मतदान हे भावनेवर, घोषणांवर आणि आश्वासनांवर होत असल्याचे पहावयास मिळते.केवळ ‘अच्छे दिन आयेंगे’ या तीन शब्दांवरच मतदारांनी भाजपच्या झोळीत भरभरून मतदान दिले होते. पण हेच चित्र कॉंग्रेसच्या बाबतीतही मतदारांनी एकदा नव्हे तर अनेकदा केलेले आहे. गरीबी हटाव या घोषणेवरही कॉंग्रेसने लोकसभा निवडणूका जिंकल्या आहेत. गरीबी आजही कायम आहे. त्यामुळेच आगामी काळातही भाजप आपली प्रतिमा कशी बनवते, विकासकामांचे मार्केटींग कशा प्रकारे करते, निवडणूका जवळ आल्यावर कोणकोणते निर्णय घेते यावर बरेच काही अवलंबून आहे. नांदेड मनपा निकालावरून आराखडे बांधणे म्हणजे मुर्खाचे काम आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात झालेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आदी स्थानिक निवडणूकांमध्ये झालेल्या यशापयशाचा आढावा घेतल्यास एकेकाळी शहरी भागापुरताच मर्यादीत असलेला भाजप आता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात विखुरल्याचे पहावयास मिळत आहे. गावागावात वाहनांवर भाजपचे कमळ ठळकपणे लावलेले पहावयास मिळत आहेे. नांदेड हा चव्हाणांचा बालेकिल्ला. शंकरराव चव्हाणांनी मुख्यमंत्री पदापासून केंद्रीय मंत्रिमंडळातही अनेक पदे भूषविली आहेत. अशोक चव्हाणांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले असून सध्या ते महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्षपद आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आताचा विचार करत असतानाच भाजपची निवडणूक रणनीती आखून तयार झालेली आहे. लोकसभा निवडणूकीसाठी मतदारसंघात किती बुथ आहे, कोणत्या बुथवर कोण काम करणार, मतदानाच्या दिवशी कोण आत बसणार, कोण बाहेर बसणार आणि मतदारांना मतदानासाठी बाहेर कोण काढणार ही भाजपची तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका जरी यदाकदाचित झाल्यास त्या निवडणुकांना सामोरे जाण्याची सर्वाधिक तयारी आज भाजपचीच आहे, हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. आज भाजपचे सव्वाशे आमदार आहेत. उद्या गृहीत धरले भाजपचे ४० विद्यमान आमदार पडले तरी ८५ आमदारांच्या पाठबळावर भाजप अन्य कोणासोबत सहज सत्ता स्थापन करू शकतो. कोणत्याही पक्षाचे ४० विद्यमान आमदार पराभूत होणे शक्यच नाही. त्यातच गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत भाजपला सत्ता मिळाली नसली तरी शिवसेनेच्या तोडीस तोड जागा भाजपने जिंकल्या आहे. ग्रामीण भागात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या तुलनेत भाजपनेच मुसंडी मारलेली आहे. ऊर्जामंत्रीपदी असणारे चंद्रशेखर बानवकुळे ग्रामीण भाग पिंजून काढत आहे. शेतकर्यांच्या बांधावर जावून शेतकर्यांशी सुसंवाद साधत आहेत. मंत्र्यांसह आमदारांनाही आपल्या कामाचे अहवाल सतत पक्षश्रेष्ठींना सादर करावे लागत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात हे कधीही घडले नव्हते. भाजपचे निवडणूक नियोजन झाले असून आक्रमकतेवर भर दिला जाणार आहे. सभासद नोंदणीसह विविध अभियानांच्या नावाखाली भाजपचा घरटी जनसंपर्क वाढीस लागला आहे. एका मनपा निवडणूकीने भाजपला कमी लेखण्याची चुक कोणताही पक्ष अथवा राजकारणी करणार नाही. ही सोशल मिडीयावर भाजप संपल्याची कोल्हेकुई सुरू आहे. पण असल्या कोल्हेकुईने राजकीय समीकरणे आणि मतदारांची मानसिकताही कधी बदलत नाही. त्यामुळे सोशल मिडीयावर आपल्या नेत्याची बाजू घेत कोल्हेकुई करणार्यांनी आगामी काळात आपलं ‘चांगभलं’ होईल, अशी शेखचिल्ली स्वप्ने पाहू नयेत.
– – संदीप खांडगेपाटील