सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : दिवाळी तोंडावर आलेली असतानाही मुषक नियत्रंणच्या कामगारांना तीन महिन्याचे वेतन मिळालेले नव्हते. हे पाहून शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन तात्काळ न मिळाल्यास महासभेतील कामकाजात जमिनीवर बसून सहभागी होण्याचा इशारा महापौर व आयुक्तांना लेखी निवेदनातून दिला. या इशार्याची दखल घेत अवघ्या २४ तासात मूषक नियत्रंण कामगारांना दोन महिन्याचे वेतन मिळाले. नगरसेविका मांडवेताईमुळे आपली दिवाळी चांगली जाणार असल्याची प्रतिक्रिया मूषक नियत्रंणच्या कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे वेतन मूषक नियत्रंणच्या कामगारांना मिळालेले नव्हते. वेतनच नसल्याने या कामगारांना दसरा सणही साजरा करता आला नाही. तुटपुंज्या वेतनात घरभाडे, घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविताना नाकीनऊ आलेल्या मूषक नियत्रंणच्या ५० कामगारांवर वेतन नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. दिवाळी आली असतानाही पालिका प्रशासनाकडून मूषक नियत्रंणच्या कामगारांच्या वेतनाबाबत काहीही हालचाली होत नसल्याचे पाहून नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी १२ ऑक्टोबर रोजी महापौर व आयुक्तांना लेखी निवेदन देत मूषक नियत्रंण कामगारांचे दिवाळीपूर्वी सर्व वेतन न झाल्यास महासभेत जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होण्याचा इशारा दिला होता. १६ ऑक्टोबर रोजी महासभा होती. त्यात नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा अडीच वर्षांनी जाग आलेल्या महापालिकेकडून करण्यात येणार होता. सावली गावावरूनही गोंधळ घातला जाणार असल्याचा अंदाज सोशल मिडीयावरील घडामोडीतून पालिका प्रशासनाला आला होता. त्यातच या प्रश्नावरून नगरसेविका सुनिता मांडवे सभागृहातील कामकाजात जमिनीवर बसून सहभागी झाल्यास राज्यात महापालिका प्रशासनाची दिवाळीच्या तोंडावर नाचक्की होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी १२ ऑक्टोबर निवेदनातून इशारा देताच पालिका प्रशासनाची सूत्रे हलली आणि अवघ्या २४ तासातच १३ ऑक्टोबरला मूषक नियत्रंणच्या कामगारांना दोन महिन्याचे वेतन देण्यात आले. नगरसेविका सुनिता मांडवे यांची भेट घेत मूषक नियत्रंणच्या कामगारांनी त्यांचे आभार मानले.