सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : प्रभागात विकासकामे होत नसल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कोपरखैरणे परिसरातील प्रभाग ४२ चे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य देविदास हांडेपाटील यांनी पालिका प्रशासनाकडून देण्यात येणारे सन्मान चिन्ह आणि स्मृतीचिन्ह नाकारले आहे. प्रभागातील समस्या पालिका प्रशासनाकडून सुटत नसतील आणि प्रभागात विकासकामे होत नसतील तर अशा सन्मानामध्ये स्वारस्य नसल्याचे खडे बोल नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी पालिका प्रशासनाला सुनावले आहेत. प्रभागातील विकासकामांवरून सत्कार नाकारणारे नगरसेवक देविदास हांडेपाटील नवी मुंबईकरांमध्ये प्रशंसेचे मानकरी ठरले असून फेसबुक, व्हॉट्सअपवरूनच नाही तर ट्विटरवरही हांडेपाटलांवर कालपासून प्रशंसेचा वर्षाव केला जात असून चर्चेतून हांडेपाटलांच्या निर्णयाची दखल घेतली जात आहे.
२०१५ साली महापालिकेचे पाचवे सभागृह एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूका झाल्यावर मे महिन्यात अस्तित्वात आले. तब्बल अडीच वर्षानंतर पालिकेच्या पाचव्या सभागृहात निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार घेण्याविषयी पालिका प्रशासनाला जाग आली. देविदास हांडेपाटील हे नवी मुंबईचे शिल्पकार असलेल्या लोकनेते गणेश नाईकांचे कडवट अनुयायी. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुलुखमैदानी तोफ असलेले प्रामाणिक व्यक्तिमत्त्व. मागील महासभेतही त्यांनी कोपरखैरणेच्या माता बाल रूग्णालयावरून त्यांनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढत रूग्णालयाअभावी कोपरखैराणेवासियांचे हाल होत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. स्थायी समितीमध्येही विविध विषयावर अभ्यासपूर्ण मत मांडत त्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. प्रभागातील समस्या व विकासाबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून आणि अधिकार्यांकडे चपला झिजवूनही कामे होत नसल्याने देविदास हांडेपाटील गेल्या काही दिवसापासून आक्रमक झाले आहेत. सोमवारी झालेल्या महासभेदरम्यान त्यांनी पालिका प्रशासनाकडून होत असलेला सत्कार नाकारत आपला स्वाभिमानी बाणा नवी मुंबईकरांना दाखवून दिला. प्रभागात विकासकामे करा आणि नागरिकांच्या समस्या सोडवा, तोच माझा खरा सत्कार असेल असे खडे बोल हांडेपाटील यांनी पालिका प्रशासनाला सुनावले. एकीकडे पालिका प्रशासन काम करत नसल्याचा डांगोरा पिटणारा अधिकांश नगरसेवक पालिका प्रशासनाकडून होणारा सत्कार स्विकारत असताना हांडेपाटील यांनी घेतलेली भूमिका नवी मुंबईकरांमध्ये चर्चेचा आणि प्रशंसेचा विषय ठरली आहे.