स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई :- आपल्या शहराला एक सांस्कृतिक चेहरा मिळविण्यासाठी यासाठी संघर्ष करणार्या नवी मुंबईकरांच्या दिवाळीला खर्या अर्थांने संगीतमय सुरूवात झाली असून दिवाळीच्या सुरूवातीलाच सकाळी तब्बल साडे तीन तास हिंदी-मराठी गाण्यांची मैफील त्यांना भेट रूपाने मिळाली.
एनआरबी एज्युकेशनल सोशल ऍण्ड कल्चरल ट्रस्टच्या वतीने बुधवारी सकाळी दि. १८ ऑक्टोबर रोजी नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आलेे होते. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव रामा भगत यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संगीताचा वारसा व चालीरितीची परंपरा जोपासण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी ७ वाजता या कार्यक्रमास सुरूवात होवून सकाळी १०.३० वाजेपर्यत हा कार्यक्रम चालला. या कार्यक्रमामध्ये शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार, ज्ञानेश्वर सुतार, नगरसेविका ॠचा पाटील, शिवसेना विभागप्रमुख गणेश घाग, गणेश पावगे, शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख व प्रभाग ८६चे शाखाप्रमुख दिलीप आमले, समाजसेवक प्रल्हाद पाटील, ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे नवी मुंबई प्रतिनिधी संदीप खांडगेपाटील, दै. पुण्यनगरीचे नवी मुंबई प्रतिनिधी अशोक शैशवरे, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक, शाखाप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या रणरागिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमात ‘इर्र’ टिव्हीवरील गौरव महाराष्ट्राचा कार्यक्रमातील महाविजेती गायिका धनश्री देशपांडे, सारेेगामाफेम गायिका पल्लवी केळकर, अभिजित राणे, ‘गौरव महाराष्ट्रा’मधील विजेता सौरभ बखारे आदी सहभागी झाले. अनिल गावडे (ढोलक), श्रीकांत राईलकर (ऑक्टोपॅड), महेंद्र गोखले (सिंथेसायझर), मयुरेश शेरलेके (तबला), पं. गंगाधर देव आदी वादक कलाकारांनी गायकांना सुरेल साथ दिली. तब्बल साडे तीन तास चाललेल्या हिंदी-मराठी गाण्यांची मेजवानी घेण्यासाठी आगरी-कोळी भवनात नवी मुंबईकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमामध्ये शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी नवी मुंबईकरांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे आयोजक नामदेव भगत यांनी आपल्या शाळेमध्ये दहावीमध्ये प्रथम येणार्या विद्यार्थ्यांच्या आई-वडीलांच्या हस्ते आपण ध्वजारोहण करत असल्याची माहिती यावेळी दिली. आपल्या पालकांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याची संधी मिळावी यासाठी विद्यार्थ्यांमध्ये गुणांसाठी पर्यायाने यशासाठी चढाओढ निर्माण झाली असल्याची माहिती नामदेव भगत यांनी दिली.