सखापाटील जुन्नरकर :- ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आता तोंडावर आलेली असताना महापौर पद मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. स्थायी समिती सभापतीपद मागच्या वेळी मिळविण्यात यशस्वी झालेल्या शिवसेनेच्या शिलेदारांनी यावेळी महापौर पद कोणत्याही परिस्थितीत मिळविण्याचा चंग बांधत हालचाली सुरू केल्यामुळे यंदाची महापौर पदाची निवडणूक चुरशीची झाली आहे. यंदा नवी मुंबई महापौर पदासाठी घोडेबाजाराच्या माध्यमातून करोडो रूपयांचे अर्थकारण होणार असल्याचे नवी मुंबईच्या राजकारणात बोलले जात आहे.
१११ नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५२ नगरसेवक असून ५ अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला अपक्षांचे टेकू मिळाल्यामुळे सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहूमत आहे. तथापि अपक्षांच्या पाठबळामुळे राजकीय अस्थिरता राहू नये ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या आघाडीचा स्थानिक पातळीवर धर्म पाळत उपमहापौरपद आणि एक विषय समिती सभापती पद देत कॉंग्रेसलाही सत्तेत सहभागी करून घेतले आहे.
मागील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत कॉंग्रेसकडून दगाफटका झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या एका मताने स्थायी समिती सभापतीपद गमवावे लागले होते. यंदा शिवसेना आपले ३८, भाजपाचे ६ असे ४४ नगरसेवक घेवून महापौरपदाच्या निवडणूक रिंगणात मागील महिन्यापासून कंबर कसून उतरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील असंतुष्ठांना चुचकारण्यांचा प्रयत्न चालू आहे. राष्ट्रवादीतील नाराजांनी महापौर पद निवडणूकीअगोदर राजीनामा दिल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ कमी होणार हे लक्षात घेवून मागील तीन-चार दिवसापासून राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांना राजीनामा देण्यासाठी शिवसेनेतील मातब्बरांकडून मनधरणी सुरू आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षात बिभिषण मोठ्या प्रमाणात असल्याने गुप्त हालचालीही उघड होवू लागल्या आहेत. भिवंडी पॅटर्नचा आधार घेत शिवसेनेने कॉंग्रेसला उपमहापौर पद देवू केले आहे. शिवसेनेकडून सध्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते असलेले विजय चौगुलेंना महापौर पदाकरिता निवडणूक रिंगणात उतरविले जाणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अद्यापि कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी जयवंत सुतार, डॉ. जयाजी नाथ, विनोद म्हात्रे, अशोक गावडे अशा विविध नावांची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराजीचा फायदा उचलण्यासाठी शिवसेना दिवस-रात्र धावपळ करत असली तरी शिवसेनेतील सात जण वेडात धावण्याची चर्चा खुद्द शिवसेना वर्तुळात सुरू आहे. या नाराजांची सप्तपदीची तयारी सुरू झाली असून खुद्द ठाण्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर या सप्तपदी जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. स्थायी समिती सदस्यपदावरून शिवसेनेत निर्माण झालेले वादळ अद्यापि शमलेले नाही. या सप्तपदीव्यतिरिक्त शिवसेनेतील अनेक नगरसेवक आमदार संदीप नाईकांच्या संपर्कात गेल्यामुळे शिवसेना नेत्यांची झोप उडाली आहे.
मागील दोन्ही विधानसभा निवडणूकीत आमदार संदीप नाईकांनी शिवसेनेच्या विजय चौगुलेंना पराभूत केले आहे. आमदार संदीप नाईकांच्या रणनीतीचा थांगपत्ता त्यांच्या चेहर्यालाही लागत नसल्याने शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहे. राष्ट्रवादीची सूत्रे संदीप नाईकांनी हाताळण्यास सुरूवात केल्यामुळे १६ नोव्हेंबर २००२ची पुनरावृत्ती होवून राष्ट्रवादी कॉंग्रेस दणदणीत विजयी होण्याची भीती शिवसेना पदाधिकार्यांकडून व शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. आमदार संदीप नाईकांचे विरोधी पक्षातील अधिकांश नगरसेवकांशी मैत्रीचे संबंध असल्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील मातब्बरांवर आपल्याच पक्षातील नगरसेवकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे.
कॉंग्रेसच्या दहा नगरसेवकांच्या भरवशावर शिवसेना समीकरणे आखत असली तरी कॉंग्रेसमधील गटबाजी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अथवा शिवसेनेला फलदायी ठरली हे महापौर निवडणूक निकालानंतर समजून येणार आहे. राष्ट्रवादीकडून जयवंत सुतारांना महापौर पदाची उमेदवारी मिळाल्यास कॉंग्रेसच्या मिरा पाटील त्यांना कितपत मतदान करतील याबाबत आजही प्रश्नचिन्ह कायम आहे. विनोद म्हात्रेंच्या महापौर पदात अडथळे आणण्याकरिता भाजपातील काही महारथी दिवाळीनंतर सज्ज झाले असून त्यांच्यामागे भुखंडाचे शुक्लकाष्ठ लावण्याची जय्यत तयारी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपमहापौरपदाकरिता वाशी गावचा भगत परिवार आणि गोठीवलीतील म्हात्रे परिवार आक्रमक असून यामुळे सभागृहात कॉंग्रेस विभागण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांना दिवाळीपूर्वीच मिठाईचा गोडवा चाखावयास मिळाल्याने दिवाळी चांगली गेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना विरूध्द पक्षातील नगरसेवकांना फोडण्यात व्यस्त असले तरी सक्षम बिभीषणांमुळे घडामोडी जगजाहिर झाल्या आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेसाठी महापौर निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठेची झाल्याने आगामी दहा दिवसात नवी मुंबईतील राजकारणात पडद्यावर आणि पडद्याआड घडामोडी गतीमान होणार आहेत.