स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई ़: जुईनगर येथील चिंचोली तलाव बाराही महिने २४ तास बकालपणाच्या विळख्यात अडकलेला आहे. या तलावाच्या तसेच तलाव सभोवतालच्या परिसरात स्वच्छता राबविण्याविषयी स्थानिक राजकारणी, नियुक्त केलेले ठेकेदार आणि पालिका प्रशासन उदासिनता दाखवित असल्याचा संताप जुईनगरच्या स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जुईनगरच्या चिंचोली तलावालगत आजही फेरफटका मारला असता, आपणास दुर्गंधी येत असल्यामुळे नाकावर रूमाल ठेवूनच वावरावे लागते. तलावाच्या प्रवेशद्वारालगतच आपणास नेहमी कचर्याचे ढिगारे विखुरलेले पहावयास मिळतात. तलावालगत असलेल्या उद्यानाच्या कोपर्यावर तलावाच्या संरक्षक जाळीलगत कचर्याचा दुसरा ढिगारा मोठ्या प्रमाणावर विखुरलेला असतो. वर्षभरात कधीही तलाव परिसरात आल्यास बाराही महिने या ठिकाणी कचर्याचे ढिगारे विखुरल्याचे आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याचा संताप आता स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तलावातील पाणी पूर्णपणे दूषित असून शेजारच्या भागातील झोपडपट्टीतील महिला तलावात कपडे धुण्याचे काम करत असून सुरक्षा रक्षकही त्यांना काहीही करत नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. गणेशोत्सव झाल्यावर तसेच दसरा झाल्यावर अनेक महिने तलावात गणेशाच्या मूर्ती तसेच देवीच्या मूर्ती पहावयास मिळतात. तलावातील पाण्यावर काळा तवंगरूपी थर आला आहे. कचर्याच्या ढिगार्यामुळे डासांचा उद्रेक वाढीस लागला असून लगतच्या उद्यानात फिरावयास येणार्या स्थानिक रहीवाशांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. तलावाच्या संरक्षक जाळीवर कपडे लांबवर सुकण्यासाठी घातले जात असल्याने तलावाच्या बकालपणात आणखीनच भर पडली आहे.
तलावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नियोजित उद्यानाच्या नामकरणासाठी राजकारण्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यासाठी वेळ आहे, परंतु चिंचोली तलावाच्या स्वच्छतेसाठी, कचर्याच्या दुर्गंधीतून मुक्त करण्यासाठी राजकारण्यांना वेळ नसल्याची खंत स्थानिक रहीवाशांनी यावेळी व्यक्त केली.
याबाबत उद्यानात फिरत असलेले स्थानिक रहीवाशी आणि इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी या तलावाच्या स्वच्छतेसाठी आपण पालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करत असून कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी पालिका आयुक्त कार्यालयात खातरजमा करून घ्यावी. गणेशोत्सव, दसरा गेल्यावरही तलावात मुर्त्यांचे असलेले अवशेष हटविण्यासाठी, येथील बकालपणा आणि दुर्गधी दाखविण्यासाठी आपण आयुक्तांना या ठिकाणी स्वत: येवून समस्येची पाहणी करण्याविषयी लेखी निवेदन दिले असल्याचे रवींद्र सावंत यांनी यावेळी सांगितले.