मनसेचा सिडको महापालिका प्रशासनाला इशारा !
स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई ़: नवी मुंबईतील काही रेल्वे स्थानकांच्या फुट ओव्हर ब्रिज परिसरामध्ये आणि रेल्वे स्थानकाबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान बसविले असल्याच्या विरोधात आज मनसेने सिडको अतिक्रमण नियंत्रक श्री.एस.एस.पाटील आणि महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांना निवेदन दिले.
एल्फिन्स्टन स्थानकात घडलेलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप मोर्चा काढला होता आणि फेरीवाले हटविण्यास १५ दिवसांची मुदत दिली होती. प्रशासनास दिलेली मुदत संपलेली असून येत्या दोन दिवसांत मनपा आणि सिडको मार्फत रेल्वे स्थानकांवरील अतिक्रमण आणि फेरीवाले हटवले गेले नाहीत तर मनसे स्टाइल आंदोलन करून या अनधिकृत फेरीवाल्यांना अधिकाऱ्यांच्या दालनात बसवू असा गर्भित इशारा निवेदनाद्वारे मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आणि सिडको यांना दिला आहे.
एखादी दुर्घटना नवी मुंबई परिसरामध्ये भविष्यात घडू नये म्हणून सिडको आणि पालिका अधिकाऱ्यांनी वेळीच ताबडतोब उचित पावले उचलावीत अशी मागणी यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने केली.
सिडको आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या या भेटी दरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही त्वरित कारवाई करू असे आश्वासन दिले. तसेच मनपा अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांनी तात्काळ वॉर्ड अधिकाऱ्यांना फोन करून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.
तसेच उद्यापासून नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानकांच्या प्रबंधकांना भेटून स्थानिक मनसे पदाधिकारी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करतील असे देखील मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात मनसे शहर सचिव संदीप गलुगडे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, नितीन चव्हाण, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, सचिन कदम, स्वप्नील गाडगे, अर्जुन देवेंद्र, विराट शृंगारे, सागर नाईकरे, अप्पासाहेब जाधव, शिवम कवडे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.