दिपक देशमुख
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता घणसोली कॉलनीतील कचरा उचलणे मंगळवारपासून (दि. २४ ऑक्टोबर) बंद केले आहे. येत्या २४ तासात घणसोली कॉलनीतील कचरा पालिका प्रशासनाने न उचलल्यास तो कचरा विभाग अधिकार्यांच्या दालनात आणून टाकण्याचा इशारा मनसेचे शहर सचिव आणि स्थानिक भागातील आदर्श गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष संदीप गलुगडे यांनी महापालिका प्रशासनाला लेखी निवेदनातून दिला आहे.
ओला व सुका कचरा वेगवेगळा होत नसल्याने घणसोली कॉलनीतील कचरा उचलणे पालिका प्रशासनाने बंद केले आहे. संपूर्ण नवी मुंबईत कचरा उचलला जात असतानाही केवळ घणसोली कॉलनीतीलच कचरा पालिका प्रशासनाने उचलणे बंद केले आहे. कचरा वर्गीकरणाबाबत कोणत्याही प्रकारची जनजागृती न करता, मार्गदर्शन न करता, लेखी सूचना न देता पालिका प्रशासनाने कचरा उचलणे बंद केलेे असल्याचा आरोप गलुगडे यांनी केला आहे.
ओला व सुका कचरा वर्गीकरणाला मनसेचा विरोध नसून मनसेने या उपक्रमाचे सुरूवातीपासून स्वागतच केलेे आहे. तथापि कोणतीही पूर्वसूचना न देता नवी मुंबईत फक्त घणसोली कॉलनीवासियांनाच दंडीत केले जात असल्याचे संदीप गलुगडे यांनी म्हटलेे आहे.
घणसोली कॉलनीची लोकसंख्या ६० हजाराहून अधिक आहे. पालिकेने कचरा न उचलल्यामुळे परिसरात गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्या भरून वाहत आहेत. कचरा रस्त्यावर विखुरला गेला आहे. सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. रहीवाशांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने २४ तासाच्या कचरा उचलला न गेल्यास विभाग अधिकार्यांच्या दालनात सर्व कचरा आणून टाकण्याचा इशारा संदीप गलुगडे यांनी दिला आहे.
यापूर्वी मागे घणसोली नोडमधील नागरी समस्या सुटत नसल्याने गलुगडे यांनी घणसोली विभाग कार्यालयालाच टाळे ठोकले होते. त्यामुळे गलुगडे यांनी कचरा आणून टाकण्याचा लेखी इशारा दिल्याने घणसोली विभाग अधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे.