श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : दिवाळी आल्यावर श्रमिकांना बोनसची आतुरतेने प्रतिक्षा असते. नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांपैकी वंडर्स पार्कच्या कामगारांना यंदा कंत्राटी कामगारांमध्ये सर्वाधिक दिवाळी बोनस मिळाला आहे. इंटक व महाराष्ट्र कर्मचारी युनियन आणि कामगार नेते रवींद्र सावंत यांच्यामुळेच आपणास सर्वाधिक दिवाळी बोनस मिळाला असल्याची माहिती संबंधित कंत्राटी कामगारांनी दिली.
नवी मुंबई प्रशासनात ग्रामपंचायत काळापासून कंत्राटी कामगार ही संकल्पना कार्यरत आहे. नवी मुंबई शहराचा कारभार ग्रामपंचायतीकडून सिडकोकडे आणि सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरीत झाला. तशा स्वरूपात कंत्राटी कामगार ही संकल्पनाही प्रशासकीय पातळीवर स्थंलातरीत झाली.
कंत्राटी सेवेचे र्निमूलन करण्यात यावे असे स्पष्टपणे न्यायालयीन आदेश असतानाही नवी मुंबई महापालिका प्रशासनात ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राटी कामगार काम करत आहेत. विशेष म्हणजे काम करणार्या कंत्राटी कामगारांची संख्या कायम कामगारांच्या दुप्पट आहे. वंडर्स पार्कमध्ये काम करणार्या कंत्राटी कामगारांना २०१६च्या दिवाळीत बोनसदेखील मिळालेला नव्हता. २०१५च्या दिवाळीत ५००० रूपये बोनसवर कामगारांची बोळवण करण्यात आली. यावर्षीदेखील गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता बोनस मिळेल की नाही याबाबत वंडर्स पार्कचे कंत्राटी कामगार साशंक होते.
तथापि हे काम इंटक आणि इंटकप्रणित महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या संपर्कात आले. या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कामगार नेते व इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच वंडर्स पार्कच्या कंत्राटी कामगारांना यंदा १२ हजार ५०० रूपये दिवाळी बोनस देण्यात आला. हा बोनस मिळाल्याबद्दल कामगारांनी महापालिका प्रशासनाचे, ठेकेदाराचे आणि कामगार नेते रवींद्र सावंत यांचे आभार मानले आहेत.