श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : स्वमालकीचे धरण, सातत्याने मिळणारे केंद्र व राज्य सरकारकडून पुरस्कार. यामुळे राज्यात नवी मुंबई महापालिकेविषयी एक सुखद चित्र असले तरी प्रत्यक्षात महापालिकेचा कामगारांप्रतीचा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधार असाच आहे. सफाई कामगार, मूषक नियत्रंण कामगार यासह अन्य कंत्राटी कामगारांना दोन ते तीन महिने विलंबाने वेतन मिळत आहे. ऑक्टोबर आता संपला, सप्टेंबर महिन्याचा तरी पगार द्या असा टाहो फोडण्याची वेळ महापालिकेत कंत्राटी काम करणार्या मुषक नियत्रंण कामगारांवर आलेली आहेे.
महापालिकेत मूषक नियत्रंण कामगारांची वेतनाबाबत कधी पालिका प्रशासनाकडून तर कधी ठेकेदाराकडून छळवणूक होतच असते. मूषक नियत्रंण कामगारांचे गेल्या अनेक वर्षापासून दोन ते तीन महिने वेतन विलंबाने होतच असते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक सुरज पाटील यांनीही मागे मूषक नियत्रंण कामगारांच्या वेतनावरून पालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी तर एकदा रस्त्यावर उतरून लोकांकडे भीक मागून तसेच लोकवर्गणी मूषक नियत्रंण कामगारांचा पगार करण्याचा इशारा दिल्यावर वेतन देण्यात आले होेते. दिवाळीपूर्वी मूषक नियत्रंण कामगारांचे तीन महिन्याचे वेतन थकले असता मूषक नियत्रंण कामगारांचे दिवाळीपूर्वी वेतन न झाल्यास महासभेत जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होण्याचा इशारा शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी लेखी स्वरूपात पालिका प्रशासनाला दिला होता. नगरसेविका सौ. सुनिता मांडवे यांनी इशारा देताच अवघ्या २४ तासात महापालिका प्रशासनाने मूषक नियत्रंण कामगारांच्या थकीत तीन महिन्याच्या वेतनापैकी दोन महिन्याचे वेतन मूषक नियत्रंण कामगारांना दिले होते.
मूषक नियत्रंण कामगारांना मूषक पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा पालिका प्रशासनाकडून तसेच ठेकेदारांकडून देण्यात येत नाही. कामगारांना विजेरी (टॉर्च), काठी स्वत:ला विकत आणावी लागते. उंदीर मारण्यासाठी गोळ्या टाकणे, गोळ्या बनविणे यासाठी मूषक नियत्रंणच्या कामगारांच्या हातात कधीही ग्लोव्हज पहावयास मिळत नाही. ऑक्टोबर महिना संपत आला तरी मूषक नियत्रंण कामगारांना सप्टेंबर महिन्याचे वेतन न मिळाल्याने महापालिका प्रशासनाचे कामगारहितैषी धोरण केवळ कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे.