श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ सारख्या वर्दळीच्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुसुम या गृहनिर्माण सोसायटीत दरोडा पडला. रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे दोन कोटी नऊ लाख रूपयांचा ऐवज चोरीला गेला. वाशी सेक्टर १७ हा उच्चभ्रूचा परिसर. परंतु या गर्भश्रीमतांकडे, उच्चभ्रूकडेे गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षा व्यवस्थेकडे खर्च करायला पैसा नसल्याने स्वस्तातील सुरक्षा व्यवस्था राबवित असल्याचा मुद्दा पुन्हा एकवार ऐरणीवर आला आहे.
वाशी सेक्टर १७ मधील कुसुम या गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशी आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजी मार्केटचे व्यापारी अरूण मेनकुदळे यांच्या घरी हा दरोडा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पडला. कुरियरच्या बहाण्याने एक महिला व पाच युवकांनी हा दरोडा घडवून आणत दोन कोटी नऊ लाख रूपयांचा ऐवज चोरून पलायन केले. या दरोडड्याने वाशी परिसरात खळबळ उडाली असली तरी या गर्भश्रीमतांच्या गृहनिर्माण सोसायटीकडे सभोवताली पाहिले असता ढिसूळ सुरक्षा असल्याचे दिसून आले. या गृहनिर्माण सोसायटीच्या मागील बाजूस पामबीच मार्ग असून या बाजूची इमारतीची संरक्षक भिंतही फारशी उंच नाही. पामबीच मार्गावर गाडी उभी करून दरोडेखोर भिंतीवर उडी मारून पामबीच मार्गावर असलेल्या गाडीतून सहज भरधाव वेगाने पलायन करू शकतात. दरोडेखोर ज्या प्रवेशद्वारातून बाहेर गेले, त्या प्रवेशद्वाराची उंचीही कमी आहे. या गृहनिर्माण सोसायटीची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी सकाळी दोन आणि रात्री दोन सुरक्षा रक्षक असतात. सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली असता या इमारतीला पांडे नावाच्या गृहस्थांची एजंन्सी सुरक्षा पुरवित असल्याचे समजले. या गृहनिर्माण सोसायटीकडून पांडेला चार सुरक्षा रक्षकांचे २४ हजार रूपये म्हणजेच एका सुरक्षा रक्षकांमागे सहा हजार रूपये देण्यात येत आहेत. त्यातील प्रत्येक सदस्याचे हजार रूपये काढून पांडे त्या सुरक्षा रक्षकांना महिन्याचे ५ हजार रूपये वेतन देत आहे. बारा तासाची ड्युटी आणि अवघा पाच हजार पगार. कोणता सुरक्षा रक्षक डोळ्यात तेल घालून बारा तास उभा राहून सोसायटीच्या चौफेर बाजूला लक्ष देणार..
नवी मुंबई परिसरात ठिकठिकाणी अनेक पांडे आणि भानुसिंगसारख्या सुरक्षा एजंन्सीकडून गृहनिर्माण सोसायट्या सुरक्षा रक्षक घेत आहेत. या सुरक्षा रक्षकांच्या हातात अवघे ४ ते ५ हजार रूपये टेकविले जातात. बारा तासाची ड्युटीला हा पगार असल्यावर कोणता सुरक्षारक्षक इमानेइतबारे काम करत असेल यावरही प्रश्नचिन्ह कायम आहे.अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या सुरक्षा रक्षकांची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला सोसायटीच्या कार्यकारिणीकडून कळविण्यातही येत नाही. उच्चभ्रूच्या गृहनिर्माण सोसायट्यातील स्वस्तातील सुरक्षा व्यवस्था हा मुद्दा वाशीतील अरूण मेनकुदळे यांच्या घरी पडलेल्या दरोड्यामुळे प्रकाशझोतात आला आहे.