सुजित शिंदे ़: ९६१९१९७४४४
नवी मुंबई : थकीत वेतन, पीएफचा भरणा नसणे, कामातून निवृत्त झाल्यावरही पैसे न मिळणे यामुळे संतप्त झालेल्या नवी मुंबईतील टॉप्स सिक्युरिटीच्या कामगारांनी बुधवारपासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सुमारे ६० कामगारांनी कार्यालयासमोरच एकदिवसीय उपोषण करत आपला संताप व्यक्त केला आहे. आठ दिवसाच्या आत आपले वेतन न मिळाल्यास आणि वेतन तसेच अन्य समस्या न सुटल्यास कार्यालयात येवून स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतण्याचा इशारा यावेळी काही कामगारांनी दिल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईमधील जुईनगर रेल्वे स्थानकामध्ये पहिल्या मजल्यावर टॉपर्स सिक्युरिटीचे कार्यालय आहे. या कार्यालयात ७००हून अधिक कामगार काम करत आहेत. या कंपनीकडून एमआयडीसीतील विविध कंपन्यांना सुरक्षा पुरविली जाते. कंपनीकडून कामगारांना तीन ते चार महिने वेतन न दिल्याने सर्व कामगारांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. काही कामगारांचे जानेवारी महिन्यापासून वेतन झालेले नाही. संतप्त कामगारांनी वेतन मिळाल्याशिवाय काम न करण्याचा इशारा दिला आहे. आज ६० कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच एक दिवसीय उपोषणही केले. निवृत्त झालेल्या कामगारांचेही पैसे देण्यात आलेले नाही. मागील काही वर्षापासून कामगारांचा पीएफदेखील कंपनीने भरलेला नाही. याबाबत कंपनीच्या अधिकार्यांकडे विचारणा केली असता विभागीय अधिकारी अफ्तार हुसैन यांनी काही महिन्याचे वेतन थकल्याचे मान्य केले. हुसैन यांचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या वाय.एस.साहील यांनी सरळ आपण या कंपनीत कामच करत नसल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. साहील हे वरिष्ठ अधिकारी असून आपल्या कागदावर तेच स्वाक्षरी करत असल्याचे कामगारांनी सांगितले. तथापि साईल यांनी आपण या कंपनीत कामाला नसल्याचे सांगत कामगारांनाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला. दुसर्या कंपन्यांना सुरक्षा पुरविणार्या टॉप्ससारख्या सिक्युरिटी कंपनीत कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.