दिपक देशमुख
नवी मुंबई : महापालिकेच्या कोपरखैराणे येथील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण करणार्या परिचारिकांना मारहाण झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. विशेष म्हणजे यावेळी पालिकेचा सुरक्षा रक्षकही उपलब्ध नव्हता आणि नागरी आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही नसल्याचे दिसून आले. पालिका नागरी आरोग्य केंद्रात मारहाण झालेली असताना प्रशासनाकडून याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही.
कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रात परिचारिकांकडून लहान मुलांना लसीकरण करण्याचे काम सुरू होते. लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येकाला क्रमांक देवून रांगेत लस देण्याचे काम सुरू होते. बोनकोडे गावातील एका महिलेचा ४५ क्रमांक होता. लसीकरणासाठी २५ क्रमांक सुरू असताना त्या ४५ क्रमांक असलेल्या महिलेने रांग तोडून मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असता परिचारिकेने त्यांना असे न करण्यास सांगितले. यावरून वाद होत बाचाबाची वाढली. संबंधित महिलेने परिचारिकेच्या कानशीलात लगविल्या व मारहाण करत थेट शिवीगाळही केली. त्या महिलेने गावातून अन्य महिलांनाही बोलावून घेतले. परिचारिकांनी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित जमावाकडून तोडफोडही करण्यात आली. सुमारे दीड तास हा गोंधळ सुरू होता. यावेळी पोलिस आले असता रूग्णालयातील जबाबदार अधिकार्याने हा प्रकार आमचा आम्ही पाहून घेवू असे सांगितल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी नागरी आरोग्य केंद्रातील परिचारिका व अन्य महिला कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कोणी काहीही बोलण्यास तयार नाही. नागरी आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही नसून दुपारी ३ वाजेपर्यत या ठिकाणी सुरक्षा रक्षकही नसतो. आरोग्य विभागातील कर्मचार्यांना शिवीगाळ व मारहाणीचे प्रकार यापूर्वीही घडले असताना पालिका प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यास तत्परता दाखविलेली नाही. कर्मचार्यांना व्यक्तिक पातळीवर तक्रार करावी लागत आहे. नागरी आरोग्य केंद्रात प्रकार घडलेला असतानाही अजूनपर्यत पालिका प्रशासनाने तक्रार केलेली नाही. पालिकेच्या आरोग्य विभागात काम करणार्या कर्मचार्यांना कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे कोपरखैराणे प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.