दिपक देशमुख
नवी मुंबई : घणसोलीतील गुणाली तलावामध्ये गुरूवारी सकाळी मृत मासे मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळाले. या मृत माशाप्रकरणी तलावात झालेल्या गणेशमूर्ती विसर्जनावरून झाल्याचे एकीकडे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे स्थानिक रहीवाशी आणि मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी काही दिवसापूर्वी झालेल्या छटपुजेवरून हे मासे मृत झाल्याचे सांगितले. मृत माशावरून मनसे व पालिका प्रशासनात वादंग होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
नवी मुंबई मधील घनसोली सेक्टर ८ घनसोली गावाशेजारी असलेल्या गुणाली तलावामध्ये मासे मरून पडलेले मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले , कार्यकर्ते संतोष ढोले यांनी ही बातमी नवी मुंबई शहर सचिव संदीप गलुगडे यांना देताच संदीप गलुगडे, शाखा अध्यक्ष नितिन नाईक आणि कार्यकर्त्यांसोबत तकाळ तलावाजवळ पहोचले आणि समोर तलावात पहिले असता हजारो मासे त्या ठिकाणी मरून पडलेल्या अवस्थेत दिसले. ताबड़तोब मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी घनसोली महानगरपालिका विभाग आधिकारी दत्तात्रय नांगरे यांना दूरध्वनि वरुन संपर्क करुन तत्काळ घटनास्थळी पोहचण्याची मागणी केली , त्यानुसार नांगरे आणि महापालिका कर्मचारी त्याठिकाणी उपस्थित झाले. मनसेच्या संदीप गलुगडे यांनी सदर घटनेचा जाब नांगरे यांना विचारला असता ते निरुत्तर होते , त्यांनी गणपती विसर्जना मुळे हे घड़लेले असल्याचे सांगितले , परंतु सदर घटनेचा तीव्र निषेध करत महानगरपालिकेच्या हलगर्जिपना मुळेच हजारों माश्याना आपले प्राण गमवावे लागले असल्याची भावना संदीप गलुगडे यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वीच सदर ठिकाणी छट पुजेचा कार्यक्रम देखील पार पडला होता , त्यामुळेच तलवात हार आणि इतर सामग्री टाकून देत उत्तर भारतीय नागरिकांनी ही घाण केल्याचा आरोप मनसेने केला.
आणि सदरच्या समूर्ण घटनेकडे महानगरपालिकेने डोळे झाक केली त्यामुळे हजारो माश्याना आपले प्राण गमवावे लागले आहेत असे मत मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी त्या ठिकाणी मांडले.
सदर घटनेच्या प्रसंगी मनसे पदाधिकारी पोहचले असता महानगरपालिकेचा सुरक्षा रक्षक देखील तिथे उपस्थित नसल्याचे आणि तलवाच्या आजु बाजूला अनाधिकृत झोपड़्या असल्याची गंभीर बाब देखील संदीप गलुगडे यांनी विभाग अधिकारी दत्तात्रय नांगरे यांच्या निदर्शनास आणून दिली.
सदर घटनेस जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी विभाग अधिकारी यांच्याकडे संदीप गलुगडे आणि नितिन नाईक यांनी लावून धरली. यावेळी तलावात असलेला मोठ्या प्रमाणावरील कचरा पाहून महापालिका तलाव स्वच्छतेबाबत किती गंभीर आहे, हे पहावयास मिळाले. महापालिका प्रशासनाकडून गणेश विसर्जनानंतर पाणी दूषित होवून हे मृत मासे प्रकरण घडल्याचे सांगत आहे, तर मनसे या घटनेला छट पुजेचा रंग देत आहे. मात्र तलाव स्वच्छतेकडे महापालिका कानाडोळा करत असल्याचे दिसून आले.