सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : मुंबई व लगतच्या परिसरातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पळविल्याची ओरड सगळीकडे होत असतानाच गुजरातमधील भाज्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अतिक्रमण केल्याचे पहावयास मिळत आहे. महाराष्ट्रातील भाज्यांपेक्षा परराज्यातीलच भाज्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत आहे. परराज्यातील भाज्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण गुजरातमधील भाज्यांचेच आहे
नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये महाराष्ट्रातील भाज्यांचे विक्रीला येण्याचे प्रमाण नगण्य झाले असून राजस्थान,गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचल, दिल्ली यासह अन्य राज्यांतील भाज्या अधिक प्रमाणात विक्रीला येवू लागल्या आहेत. कोबी, फ्लॉवर, वांगी, दुधी, भेंडी, पडवळ, दोडका, टॉमटो, तोंडली, फरशी,गवार, सिमला मिरची यासह सर्वच भाज्या परराज्यातून येथील बाजारात येत आहे. परराज्यातून विक्रीसाठी आलेल्या भाज्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण गुजरात राज्याचे आहे. परराज्यातील भाज्यांनी महाराष्ट्रातील कृषी बाजारपेठा केवळ शिरकाव नव्हे तर प्रभुत्व मिळविणे ही महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी व कृषीक्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरू शकेल. आज शनिवारी पहाटे ४ ते सकाळी ७ मध्ये आवक झालेल्या ४०० हून अधिक वाहनांपैकी जवळपास ३०० वाहने परराज्यातून भाज्या घेवून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात भाज्यांना भाव अधिक मिळत असल्याने व भाज्यांचे पैसे तुलनेने लवकर रोखीच्या स्वरूपात मिळत असल्याने परराज्यातील शेतकर्यांमध्ये महाराष्ट्रातील बाजारपेठांचे आकर्षण वाढीस लागले आहे.