सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या सभागृहातील दुसरा महापौर व उपमहापौर ठरविण्यासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महापौरपदाच्या लढतीत विजय चौगुलेंसारखा मातब्बर मोहरा शिवसेनेने न उतरविल्यामुळे ही लढत एकतर्फीच होणार असल्याचे अर्ज भरल्यानंतरच स्पष्ट झाले. उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून द्वारकानाथ भोईर आणि कॉंग्रेसकडून मंदाकिनी म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून वैजयंती भगत यांनी बंडखोरी करत उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वैजंयती भगत यांनी बंडखोरी केल्यामुळे उपमहापौरपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे.
कॉंग्रेसचे सभागृहात १० नगरसेवक असून त्यातील ३ नगरसेवक हे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि निष्ठावंत कॉंग्रेसी म्हणून ओळखल्या जाणार्या दशरथ भगत यांच्याच घरातील आहेत. मागच्या वेळीदेखील उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांच्या घरातील सदस्यांची चर्चा सुरू असताना अविनाश लाड यांची त्या पदावर वर्णी लागली. यावेळीदेखील दशरथ भगत यांच्या घरातील सदस्यांची पुन्हा चर्चा सुरू असताना गोठीवलीचे नांदेडशी असलेले संबंध कामाला आले आणि चर्चांना तडा गेला.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांच्याशी रमाकांत म्हात्रेंचे असलेले जवळचे संबंध यामुळे नानांचे उपमहापौर पदाची तिकीट कापले गेले असल्याची हळहळ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दशरथ भगत हे निष्ठावंत कॉंग्रेसी ओळखले जात असून कॉंग्रेसच्या पडझडीच्या काळातही त्यांनी कॉंग्रेसमध्ये राहणे पसंत केले आहे. याउलट १६ नोव्हेंबर २००२ रोजी झालेल्या निवडणूकीत कॉग्रेसचे उमेदवार अनिल कौशिक दणदणीत पराभूत होत असताना कॉंग्रेसचेच उमेदवार रमाकांत म्हात्रे उपमहापौरपदी दणदणीत मतांनी विजयी झाले होते. सध्या अनिल कौशिक नवी मुंबई कॉंग्रेसच्या प्रवाहात सक्रिय असून कोणत्याही क्षणी ते कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. १६ नोव्हेंबर २००२च्याच समीकरणाची पुनरावृत्ती होवून वैजंयती भगत या उपमहापौर होणार असल्याचे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.
कॉंग्रेस पक्षामध्ये व्हीपला कोणी फारसे जुमानत नसल्याचे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नवी मुंबईकरांना ते जवळून पहावयास व अनुभवयासही मिळाले आहे. मागच्या वेळी स्थायी समिती सभापतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप असतानाही कॉंग्रेसच्या मिरा पाटील यांनी शिवसेनेला मतदान केले होते. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर असताना मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या काळात नवी मुंबईच्या विकासकामांमध्ये अनेक वेळा कोणी खो घातला होता, हे आजही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश नाईक आणि त्यांचे समर्थक विसरले नसणार. उपमहापौरपदाच्या निवडणूकीत ऐनवेळी वैजंयती भगत यांनी माघार न घेतल्यास त्यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.