महाड येथील जनआक्रोश मेळाव्याला कोकणवासीयांचा प्रचंड प्रतिसाद
महाड, रायगड :- भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून फक्त मरण स्वस्त झाले अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे.
राज्य सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. या तीन वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जनआक्रोश सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहातील दुस-या जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन महाड येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते शरद रणपिसे, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व माजी आ. माणिकराव जगताप महाड च्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————–
मोहन प्रकाश
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी शक्तींच्या इशा-यावर देश चालवत असून गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही. सर्वसामान्यांनी कररूपाने दिलेले साडे सहा लाख कोटी रूपये आपल्या उद्योगपती मित्रांना वाटले. शाह आणि तानाशाहांची जोडी देशाला लुटण्याचे काम करीत आहे असा टोला त्यांनी लगावला. राज्यात बारा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतरही आत्महत्या केल्या आहेत. याला सरकार जबाबदार असून काँग्रेस कार्यकर्ते भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत असे मोहन प्रकाश म्हणाले.
——————-
खा. अशोक चव्हाण
गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सत्तेत बसलेल्या लोकांना जनतेचे प्रश्नांची उत्तरे सोडा प्रश्नही माहित नाहीत या सरकारला चले जाव असे सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. राज्यातील 12 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत तरी सरकारला लाज कशी वाटत नाही ? असा सवाल खा. चव्हाण यांनी केला. सरकारची कर्जमाफी फसवी असून कर्जमाफीतून मत्स्यव्यावसाय करणा-या शेतक-यांना वगळून कोकणातल्या मत्यव्यवसायिकांवर अन्याय केला आहे. राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नांनी देणेघेणे नसून जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने सुरु केलेला संघर्ष या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही.
——————————-
पृथ्वीराज चव्हाण
भाजप सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असून निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन या सरकारने पाळले नाही. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुठलाही वर्ग सरकारच्या धोरणांवर समाधानी नाही. परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
_——————————
राधाकृष्ण विखे पाटील
भाजप सरकारने सर्व घटकांची फसवणूक केली असून या कोडग्या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी व लोकांचा संताप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात झाली आहे. कर्जमाफीची खोटी प्रमाणपत्रे वाटून सरकारने शेतक-यांचा अपमान केला असून जनता सरकारला माफ करणार नाही. भाजप शिवसेना सरकारची तीन वर्ष म्हणजे घोषणांचा पाऊस आणि स्वप्नांची मालिका आहे. शिवसेनेही खोटे बोलण्याची तीन वर्ष साजरी करावीत असा टोला विखे पाटील यांनी लगावला.
यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, खा. हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांची भाषणे झाली.