स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची महापौर निवडणूक रिंगणातून माघार यामुळे एकीकडे महापौर निवडणूकीतील लढत एकतर्फी होत असतानाच दुसरीकडे उपमहापौर पदाच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या वाशी गावातील नगरसेविका सौ. वैजंयती दशरथ भगत यांच्या बंडखोरीने उपमहापौर पदाच्या निवडणूकीकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे. कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्यांची सहानुभूती सौ. वैजंयती दशरथ भगत यांच्या पाठीशी असून वैजंयती भगत यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेवू नये असा सूर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आळविला जावू लागला आहे.
महापालिका सभागृहात कॉंग्रेस पक्षाचे १० नगरसेवक असून त्यातील ३ नगरसेवक हे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्या घरातीलच आहेत. दशरथ भगत यांची पत्नी, भावजय आणि भावाची सून अशा तीन नगरसेविका या वाशी गावातील भगत परिवारातील आहे. दशरथ भगत यांनी महापालिका सभागृहात सलग तीन वेळा कॉंग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. महापालिका सभागृहात त्यांनी विरोधी पक्षनेते पदही भूषविलेले आहे. कडवट व निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते अशी दशरथ भगत यांची ओळख असून त्यांनी पडझडीच्या काळातही कॉंग्रेस पक्षाची इमानेइतबारे सेवा केली आहे. दशरथ भगत यांच्यामुळेच वाशी गाव, सानपाडा-पामबीच आणि पामबीच-जुईनगर अशा तीन प्रभागातून कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत.
कॉंग्रेस पक्षाकडून उपमहापौर पदाची उमेदवारी दशरथ भगत यांच्याच घरात कोणाला तरी मिळणार याची कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना खात्री असताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी आपली पत्नी नगरसेविका सौ. मंदाकिनी म्हात्रे यांना उमेदवारी मिळविली. वैजयंती भगत यांनी माघार न घेतल्यास मंदाकिनी म्हात्रे यांचा विजय सुकर नसल्याचे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून उघडपणे बोलण्यात येत आहे.
रमाकांत म्हात्रे यांनी १६ नोव्हेंबर २००२ रोजी झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणूकीत उपमहापौर पद मिळविले होते. या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल कौशिक पराभूत होत असताना कॉंग्रेसचेच रमाकांत म्हात्रे हे उपमहापौरपदी विजयी झाले होते. त्यातच नवी मुंबईचे शिल्पकार असलेल्या लोकनेते गणेश नाईकांशीही रमाकांत म्हात्रेंचे फारसे सख्य नाही. अनिल कौशिकही मागील काही महिन्यापासून कॉंग्रेस पक्षसंघटनेत पूर्वीसारखे जोमाने सक्रिय झाले असून १६ नोव्हेंबर २००२ रोजी महापौर निवडणूकीत झालेला पराभव आणि कोणामुळे झालेला पराभव हे अद्यापि विसरले नसणार.
रमाकांत म्हात्रे आणि दशरथ भगत या दोन्ही स्थानिक पातळीवरील कॉंग्रेसी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यातच वैजंयती भगत यांच्या बंडखोरीमुळे कॉंग्रेसचे नगरसेवकही द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. कॉंग्रेसचे नगरसेवक, पक्षीय पदाधिकार्यांचा आणि कार्यकर्त्यांचा वैजंयती भगत यांना पाठिंबा असल्याचे पडद्याआडच्या घडामोडीवरून पहावयास मिळत आहे. कॉंग्रेस पक्षाचा ‘व्हिप’ जुमानला नाही तरी कारवाई होत नसल्याचे नवी मुंबईमध्ये एकदा नव्हे तर अनेकदा पहावयास मिळाले आहे. वैजंयती भगत यांची बंडखोरी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली असून भगत यांनी माघार न घेतल्यास म्हात्रेंच्या वाटचालीत अडथळ्यांची मालिकाच निर्माण होणार असल्याचे पहावयास मिळत आहे.