स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : फेरीवाला आणि मनसे यांच्यातील गेले काही दिवसापासून वाद चिघळत चालला असून नवी मुंबईतील मनसेही फेरीवाल्यांच्या विरोधात आक्रमक झालेली पहावयास मिळत आहे. मंगळवारी वाशीतील फेरीवाल्यांचा तुर्भे विभाग कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा मनसे कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या भीतीमुळे बारगळल्याचे पहावयास मिळाले. मोर्चा काढण्याची भाषा करणार्यांना विभाग अधिकार्यांना निवेदन देवून काढता पाय घेण्याची वेळ आली.
फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईच्या विरोधात महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयावर फेरीवाला संघटनेचा मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाला परवानगी न देण्याची मागणी नवी मुंबई मनसेकडून पोलीस आयुक्त व स्थानिक पोलिस ठाण्याकडे लेखी निवेदनातून देण्यात आली होती. महापालिकेकडे मोर्चाबाबत फेरीवाल्यांनी परवानगी मागितली असता महापालिकेने मोर्चाविषयी स्थानिक एपीएमसी पोलीस ठाण्याकडे पोलीस संरक्षण मागितले होते. पोलिसांनी मोर्चाला परवानगी मागितली होती. अनधिकृत फेरीवाल्यांचा हा मोर्चा उधळून लावण्याची मनसेकडूनही तयारी करण्यात आली होती. एपीएमसी पोलीसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून मनसेचे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे व त्यांच्या १० सहकार्यांना सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात घेवून गेले. मनसेच्या अन्य पदाधिकार्यांचा व कार्यकर्त्यांचा पोलिस शोध घेत होते. १५ हजार फेरीवाल्यांचा मोर्चा आणण्याची भाषा करणार्या फेरीवाला संघटनेकडून जेमतेम १२ ते १३ लोक आले व विभाग अधिकार्यांना निवेदन देवून गेले. ते कधी आले व गेले, कोणालाही समजले नाही. मनसे कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या भीतीने फेरीवाल्यांच्या मोर्चाचा आज ‘फ्लॉप शो’ झाल्याचे पहावयास मिळाले.
यासंदर्भात मनसेचे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांच्याशी एपीएमसी पोलीस ठाण्यात जावून संवाद साधला असता, त्यांनी मोर्चाचे आयोजक कामगार नेते ऍड. सुरेश ठाकूर यांच्यावर कडाडून टीका केली. अनधिकृत फेरीवाल्यांची पाठराखण करणार्यांनी नवी मुंबईच्या बकालपणाचेही उत्तरदायित्व स्वीकारणे आवश्यक आहे. रस्ते, पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापले आहे. फेरीवाल्यांमध्ये मराठी माणूस व प्रकल्पग्रस्त माणूस अत्यल्प असून परप्रातियांचाच भरणा अधिक आहे. नवी मुंबई शहराचा बकालपणा घालविण्यासाठी व अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोडीत काढण्यासाठी मनसेने आक्रमक पाऊल उचलले असून आपण कोणासाठी लढा देत आहोत याचाही सुरेश ठाकूर यांनी विचार करावा असे आवाहन यावेळी विनोद पार्टे यांनी केले.
फेरीवाला संघटनेने प्रत्येक विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला असला तरी मनसेच्या आक्रमकतेमुळे फेरीवाल्यांचे मोर्चे कितपत यशस्वी ठरतात यावर आजच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.