स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी गुरूवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. शिवसेनेने विजय चौगुलेसारखा मातब्बर मोहरा निवडणूक रिंगणात न उतरविल्याने महापौर पदाची निवडणूक एकतर्फीच होण्याची चिन्हे आहे. उपमहापौर पदाच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या वैजंयती भगत यांनी बंडखोरी केल्यामुळे बोनकोडेकडून मिळणार्या सहकार्यावरच वाशी गाव अथवा गोठीवली गाव यातून कोणाला उपमहापौर पद मिळणार याचा निकाल लागणार आहे.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत हे कट्टर व कडवट कॉंग्रेसी असतानाही तसेच कॉंग्रेसच्या १० नगरसेवकांपैकी ३ नगरसेवक दशरथ भगत यांच्याच घरातील असतानाही त्यांना उपमहापौर पदाच्या तिकीटीपासून डावलण्यात आले. दशरथ भगत यांच्यावर अन्याय झाल्याची भावना कॉंग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते पक्षीय पदाधिकार्यांपर्यत सर्वच व्यक्त करत आहेत. कॉंग्रेसचे वाशीतील जिल्हा मुख्यालय अन्य जिल्हाध्यक्षांच्या काळात कसे होते आणि दशरथ भगतांच्या काळात कसे आहे, याचे दाखले कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे. खाडीपुलालगतच्या वाशी गावापासून जुईनगर कॉलनीपर्यत पडत्या काळातही कॉग्रेसचा प्रभाव आणि जनाधार वाढविण्याचे काम दशरथ भगत यांनी केले आहे.
माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या पत्नी नगरसेविका सौ. मंदाकिनी म्हात्रे यांना कॉंग्रेस पक्षाने उपमहापौर पदाकरिता उमेदवारी दिली असली तरी सौ. वैजंयती दशरथ भगत यांच्या बंडखोरीमुळे त्यांच्या वाटेत अडथळे निर्माण झाले आहे. कॉंग्रेस पक्षाचे सभागृहात १० नगरसेवक असून त्यांना उपमहापौर पदाकरिता पूर्णपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर अवलंबून राहावे लागणार आहे. आघाडी सरकारच्या काळात वर्षा बंगल्यावर महापालिकेच्या विकास कामात आणण्यात आलेले अडथळे याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक उघडपणे नाराजी व्यक्त करत आहे. सौ. मंदाकिनी म्हात्रे यांना उपमहापौरपदाच्या उमेदवारी देताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी झुकते माप दिल्यामुळे नवी मुंबईतील कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी अशोक चव्हाणांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करू लागले आहेत. वैजंयती भगत यांनी निवडणूक रिंगणातून माघार न घेतल्यास त्यांचा विजय निश्चित असल्याचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. या उपमहापौरपदाच्या निवडणूकीत रमाकांत म्हात्रे आणि दशरथ भगत यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कॉंग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता दशरथ भगत यांच्या पाठीशी उभा राहीला असून नांदेडकरांनी चुकीचा उमेदवार दिला असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. रमाकांत म्हात्रे यांनी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हानांचा पाठिंबा मिळविला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांना कितपत सहकार्य करेल याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. बोनकोडेकरांनी गोठीवलीऐवजी वाशी गावाबद्दल जिव्हाळा दाखविल्यास दुसर्या सभागृहात झालेल्या दोन्ही वेळच्या महापौर व उपमहापौेर निवडणूकीचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.