स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : दिवाळी संपल्यावर वाशी सेक्टर १७ मधील कुसुम बिल्डींगमध्ये २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता दरोडा पडला. अरूण मेनकुदळे हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमधील व्यापारी असून त्यांच्या घरी २ कोटी ९ लाख रूपयांचा हा दरोडा पडला. यामध्ये १ कोटी ९६ लाख रूपये रोख रक्कम आाणि १३ लाख १६ हजार रूपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. अरूण मेनकुदळे यांच्या सदनिकेसमोर राहणार्या शेजार्यांनी दरवाजात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे दरोडेखोरांच्या चेहर्याचा तात्काळ उलगडा झाला. या दरोड्यातील ७ गुन्हेगारांना अटक झाली असून त्यात २ महिलांचा समावेश आहे.
गुन्ह्यात संबंधित असलेल्या अद्यापि ३ फरार गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत. अटक गुन्हेगारांकडून ८० लाख ८० हजार ५६७ रूपये किंमतीच्या ऐवजाचा समावेश आहे. यात ७४ लाख रूपये रोख रक्कम आणि ६ लाख ८० हजार ५६७ रूपये किंमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या दरोड्याची मुख्य सूत्रधार अनिता मुकुंद म्हसाणे ही खांदेश्वर पोलीस ठाण्यातील एका पोलीसाची पत्नी असून तिच्यावर यापूर्वी दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपींना मुंब्रा, आंध्र प्रदेश, मिरा रोड, बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणाहून अटक करून आणण्यात आकले आहे. या ७ अटक आरोपींमध्ये खुशी जिब्राईल खान आणि जिब्राईल खान या पती-पत्नीचाही समावेश आहे. अवघ्या १२ दिवसात या दरोड्याचा शोध वाशी पोलीसांनी व गुन्हे पथकाने लावला आहे. अटक गुन्हेगारांकडून अजून ऐवज जमा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अरूण मेनकुदळे आणि सूत्रधार अनिता म्हसणे यांचा एका कार्यक्रमात परिचय आला. एकत्र व्यवसाय करण्याच्या बहाण्याने अनिताने मेनकुदळे यांच्याकडून पैसे घेतले. मेनकुदळे यांच्या पत्नीने पैशाचा तगादा लावल्यावर अनिता म्हसणे यांनी काही मालमत्तेचे कागद त्यांच्याकडे ठेवले होते. कुरियरच्या बहाण्याने दरोडेखोर घरात घुसल्यावर त्यांनी कागद कोठे आहेत अशी सतत विचारणा केल्यामुळे गुन्ह्याचा उलगडा लवकर लागणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.