स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे घणसोली सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे हे ७ नोव्हेंबर २०१७ रोजी अनधिकृत फेरीवाल्यांवर घणसोली सेक्टर-७ येथे कारवाई करीत असताना त्यांच्यावर परप्रांतीय अनधिकृत फेरीवाल्याने भ्याड हल्ला केला आणि पसार झाला. या हल्ल्यादरम्यान दत्तात्रय नागरे यांच्या हाताला व पायाला जखमा झाल्या आहेत्त. सदर घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी तीव्र निषेध केला असून नवी मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे मत व्यक्त केले.
मनसेच्या अनधिकृत फेरीवाला आंदोलनानिमित्त नवी मुंबई मनसेने सिडको प्रशासन, मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनास अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून रेल्वेस्थानके व पदपथे नवी मुंबईकर नागरिकांसाठी मोकळे करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. सदरच्या निवेदनानंतर मनपा प्रशासनाने नवी मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. अशाच मोहिमेदरम्यान सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे यांच्यावर परप्रांतीय अनधिकृत फेरीवाल्याने भ्याड हल्ला केला. सदरच्या घटनेची नवी मुंबई पोलिसांनी देखील गंभीर दखल घेऊन संबंधित परप्रांतीय अनधिकृत फेरीवाल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. भविष्यात जर कर्तव्यदक्ष अधिकार्यांवर अशा प्रकारचे हल्ले झाले तर नवी मुंबईचे महाराष्ट्र सैनिक फेरीवाल्यांना चोख उत्तर देतील असे मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी म्हटले आहे.
दरम्यान अनधिकृत फेरीवाल्यांच्या मोर्चा मनपाच्या तुर्भे विभाग कार्यालयावर काढण्यात येणार होता. त्या मोर्च्यास नवी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारावी अशी मागणी मनसेने केली होती. सदरची मागणी नवी मुंबई पोलिसांनी मान्य केल्याबद्दल मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी आभार मानले. मोर्च्याची हाक देऊन अनधिकृत फेरीवाल्यांच्या संघटनेचे तुरळक पदाधिकारी यांनी तुर्भे विभाग अधिकारी यांना निवेदन दिले आणि मोर्चा न काढताच कार्यक्रम आटोपता घेतला असल्याची माहिती मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. फेरीवाल्यांचा मोर्चा फज्जा झाल्याची चर्चा सध्या नवी मुंबई वर्तुळात आहे.
मुंबई मनपा प्रमाणे रेल्वे स्थानकांच्या १५० मीटर परिसरात तसेच शाळा व हॉस्पिटल परिसराच्या १०० मीटरच्या परिसरात ना फेरीवाला क्षेत्राच्या सीमा रेषा व फलक असावेत अशी मागणी देखील मनसेने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव संदीप गलुगडे आणि मनसे पदाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीवेळी नवी मुंबईचे महाराष्ट्र सैनिक कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असे आश्वासन मनसेने दिले.