सुजित शिंदे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : खारघर परिसरात मेथाक्युलोन या अंमली पावडरची विक्री करण्यास आलेल्या नायजेरियन इसमास अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या नायजेरियन इसमाकडून अंदाजे दोन लाख रूपये किंमतीची अंमली पावडर जप्त करण्यात आली असून या मोहीमेत पोलीस उपनिरीक्षक अजित गोळे यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.
७ नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक अजित गोळे आणि पोलीस शिपाई अमोल कर्डीले यांना त्यांच्या खबर्याकडून खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक नायजेरियन इसम मेथाक्युलोन ही अमली पावडर विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर मालमत्ता व अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा बेलापुरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल बाजारे , पोलीस उपनिरीक्षक अजित गोळे, पोलीस हवालदार शेख, कासम पिरजादे, सलीम इनामदार, अमोल कर्डीले, आकाश मुके यांनी खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ओवा चौकीजवळ असणार्या सेक्टर ३४ येथील पुलावर सापळा रचला. सांयकाळी ७ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास पॉल चिडुबेम आकोरो (वय ३६) रा. दिवा-ठाणे, हा अमली पदार्थाच्या पावडरची विक्री करण्यासाठी आलेला आढळून आला. त्याची पोलिसांनी झडती घेतली त्याच्याकडे १ लाख ९५ हजार २३० रूपये किंमतीची ‘मेथाक्युलोन’ या अंमली पावडर सापडली. त्यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १३ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी रिमांड दिला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजित गोळे अधिक तपास करत असून गोळे यांनी याप्रकरणी केलेल्या परिश्रमाची पोलीस वर्तुळात प्रशंसा होत आहे.