स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : मोदी सरकारने एक वर्षापूर्वी नोटबंदी जाहिर केली. या नोटबंदीतून काळा पैसा बाहेर येण्याऐवजी सर्वसामान्यांची ससेहोलटपट झाली. मोदी सरकार प्रसिध्दी घेण्यास प्राधान्य देत असून प्रत्यक्षात काहीही काम करत नाही. काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करणार होते. १५ लाख तर सोडा, पण १५ पैसेही मोदी सरकार कोणाच्या खात्यात जमा करू शकले नसल्याची घणाघाती टीका कॉंग्रेस पक्षाचे ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांनी केली.
नोटबंदीला एक वर्षपूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवी मुंबई कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थितांसमोर बोलताना निशांत भगत यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना कारभाराचे वाभाडेच काढले.
राज्य सरकारने राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी दिली. गाजावाजा केला. कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले. पण महाराष्ट्रात जावून चौकशी करा की किती शेतकर्यांना कर्जमाफी दिली आहे. सुरूवातीला जाहिर केलेली १० हजाराची रक्कमही शेतकर्यांना मिळालेली नाही. सरकार केवळ घोषणा करते, प्रसिध्दी मिळविते, पण प्रत्यक्षात त्या घोषणांची अंमलबजावणी कधीच होत नसल्याचा हल्लाबोल निशांत भगत यांनी चढविला.
या रॅलीत निशांत भगत यांच्यासमवेत विजय वाळूंज, दिपक पाटील, सुदर्शना कौशिक यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रेल्वे स्थानकाबाहेरच जाहिर कार्यक्रम झाल्याने रेल्वे प्रवाशांचीही गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली होती. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी मोदी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. नोटबंदीच्या काळात एटीएमच्या रांगेत मृत पावलेल्या लोकांनाही कॉंग्रेसच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.
—————————–
मोदी भक्ताचा कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न
कॉंग्रेस पक्षाच्या वतीने वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मशाल रॅलीचा कार्यक्रम सुरू होता. हातात मेणबत्ती घेवून श्रध्दाजंली वाहण्यात आल्यावर कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांची भाषणे सुरू असताना एका मोदी समर्थकाने या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसच्या लोकांशी प्रश्न विचारून अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसचे कार्यकर्ते संतप्त होवून बाचाबाची करत असतानाच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यास पोलिस ठाण्यात घेवून गेले. कॉंग्रेसच्या निशांत भगतांनी संयमाने परिस्थिती हाताळत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना शांत केले.