स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील महापालिका शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी प्रवासाकरिता महापालिका प्रशासनाने एनएमएमटी बसेसचे मोफत पास उपलब्ध करून देण्याची मागणी युवा सेनेचे बेलापुर उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी परिवहन सभापती आणि परिवहन व्यवस्थापकांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने विविध जनहितैषी आणि लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. नवी मुंबई कार्यक्षेत्रात असलेल्या महापालिका शाळेत शिक्षण घेणार्या प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या परिवहन उपक्रमाकडून (एनएमएमटी) मोफत प्रवासाची सुविधा मिळणे आवश्यक आहे. लगतची मुंबई महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांना मोफत बससेवेची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याधर्तीवर आपणही शालेय विद्यार्थ्यांना मोफत बससेवेच्या सुविधेकरिता मोफत पास सुविधा उपलब्ध करून दिल्यास शैक्षणिक कार्याला एकप्रकारे हातभार लावल्यासारखे होईल. त्यामुळे आपण लवकरात लवकर शालेय विद्यार्थ्यांना मोफत बससेवेकरिता पासेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निखिल रतन मांडवे यांनी केली आहे.