स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या सेक्टर ११ परिसरात घटना घडली आहे. बॅक ऑफ बरोडाच्या जुईनगर शाखेत ही घरफोडी झाली आहे. शनिवार व रविवार दोन दिवस बॅक बंद असल्याने नेमकी कधी ही घरफोडी झाली हे सांगणे अवघड आहे. सकाळी ९.३० वाजल्यापासून बॅकेचे कामकाज सुरू झाल्यावरही बॅकेत घरफोडी झाली असेल याची पुसटशीही कल्पना त्या बॅक कर्मचार्यांना नव्हती.
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या गळ्यातील तुटलेला दागिना ठेवण्यासाठी बॅकेत आली व ती लॉकर रूममध्ये गेल्यावर घरफोडीचा प्रकार निदर्शनास आला. बॅकेशेजारी तीन दुकाने सोडून असलेल्या एका दुकानातून थेट बॅकेच्या लॉकररूमपर्यत भुयार खोदून ही घरफोडी करण्यात आली आहे.
भक्ती रेसिडन्सी या इमारतीमध्ये बॅक ऑफ बरोडाची जुईनगर शाखा असून त्याच इमारतीच्या शॉप क्रं ७ मधील बालाजी जनरल स्टोअर्समधून हे भुयार खोदण्यात आले आहे. पाच ते बारा फुट खोल, अडीच फुट रूंद आणि अंदाजे ४५ ते ५० फुट लांबवर हे भुयार खोदण्यात आले आहे. बालाजी जनरल स्टोअर्स हे शरद कोठावळे यांच्या मालकीचे असून ते गेनाप्रसाद यांना चार महिन्यापूर्वी भाड्याने देण्यात आले होते. भुयार खोदताना माती पसरू नये यासाठी भुयारात सर्वत्र लाकडी प्लाय लावण्यात आले होते. बॅकेत एकूण २३७ लॉकर असून त्यातील ३० लॉकर तोडण्यात आले आहेत. कोणते लॉकर तोडण्यात आले आहेत तेही बॅकेने प्रसिध्द केले आहे.
यापूर्वी नेरूळ, कामोठे येथेही भुयार खोदून घरफोडी झाल्याने त्याचाही संदर्भ पोलीस तपासात घेतला जात आहे. बॅकेत घरफोडी होवून लॉकर तुटल्याचे समजताच बॅकेच्या ग्राहकांनी बॅकेपाशी येवून बॅक कर्मचार्यांशी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. सर्व लॉकरधारक आल्यावरच नक्की कितीची ही घरफोडी झाली हे समजण्यास मदत होईल.
विशेष म्हणजे बॅकेचे सीसीटीव्हीदेखील बंद असल्याने सुरक्षेबाबतचा बॅकेचे गलथानपणा व बेफीकीरीही उघडकीस आली आहे. सुरक्षा यंत्रणेचा नंबरही बॅक अधिकार्यांकडे नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या भुयाराचे खोदकाम अंदाजे दीड ते पावणे दोन महिने सुरू असताना कोणालाही याचा थांगपत्ताही लागला नाही.बेलापुर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेवून बॅक ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.