स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये गेल्या १०-१२ दिवसापासून वाढीच्या भाजीची आवक मोठ्या प्रमाणावर होवू लागली आहे. मुळा, पालक, शापू, चवळी, राई, आंबट सुका (अंबाडी), लाल माठ, शापू आदी भाज्यांचा या वाढीची भाजीमध्ये समावेश होतो. वाढीची भाजी म्हणजे अन्य भाज्यांपेक्षा खास भाजी नसून गटाराच्या व नाल्याच्या पाण्यावर जी भाजी पिकविली जाते, त्या भाजीला मार्केटमधील व्यापारी आणि खरेदीदार त्यास वाढीची भाजी या नावाने संबोधतात.
वाढीची भाजी पुणे आणि अहमदनगर येथून येणार्या भाज्यांपेक्षा फ्रेश आणि टवटवीत असते. पुणे, अहमदनगर भागातून येणार्या भाज्या ट्रक, टेम्पोतून प्रवास करत मार्केटमध्ये येतात. त्या गाडीत दबल्या जातात. वाढीची भाजी ही कल्याण-भिवंडी व ठाणे जिल्ह्याच्या अन्य भागातून रेल्वे रूळाजवळील शेतीतून येते. वाढीची भाजी व सर्वसाधारण भाजीतील एकमेव फरक म्हणजे ग्रामीण भागातून येणार्या भाज्या या दोरी, सुतळीने बांधलेल्या असतात. वाढीची भाजी ही गवताच्या काड्यानी बांधलेली असते. वाढीची भाजी ही अन्य भाज्यांप्रमाणे पोती, गोणीमध्ये नसते तर छोटी, गोल बाचकी यामध्ये वाढीची भाजी असते. इस्त्रीची कपडे जशी व्यवस्थित असतात, तशा स्वरूपात या वाढीच्या भाजीला मार्केटमध्ये आणले जाते. अन्य भाज्यांच्या तुलनेत वाढीची भाजी ५ ते ६ रूपयांनी स्वस्त आहे. अन्य भाज्यांपेक्षा स्वस्त आणि फ्रेश अशी वाढीची भाजी असल्याने ती लवकर विकली जाते. त्यामुळेच बाजारात भाज्या घेताना काळजी घ्या. स्वस्त व फ्रेश भाजीच्या आहारी जावून वाढीच्या भाज्या खावून घरात रोगराई आणू नका. वाढीच्या भाज्या या गटाराच्या, नाल्याच्या सांडपाण्यावर पिकविल्या जात आहेत. आता सुरू झालेली भाजी फेब्रुवारी अखेरपर्यत मार्केटमध्ये येणार आहे.
ही भाजी भाजी मार्केटमध्ये सर्वत्र असली तरी सी विंगमध्ये ही भाजी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मराठी व्यापार्यांनी आपले गाळे उत्तर भारतीय व्यापार्यांना भाड्याने दिले आहेत. त्याच गाळ्यावर या वाढीच्या भाजीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत आहे.