नवी मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांची मंगळवारी नवी मुंबईतील सीबीडी बेलापुर येथील कोकण विभागिय आयुक्तांपुढे सुनावणी होणार होती. कोकण विभागिय आयुक्त डॉ. जगदीश पाटील आज कार्यालयात हजर नसल्याने सुनावणी लांबणीवर पडली आहे. जगदीश पाटील आजारी असल्यामुळे आजची सुनावणी होवू शकली नाही. सुनावणीसाठी कोकण भवनात मनसेकडून ऍड. अक्षय काशिद, मकरंद पंचाक्षरी तर शिवसेनेकडून ऍड. विक्रम पै हजर होते. कोकण विभागिय आयुक्तालयाकडून आगामी तारीख आज निश्चित करण्यात आली नसली तरी लवकरच तारीख कळविण्यात येईल असे सांगण्यात आले.
मनसेचे नवी मुंबईतील पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना धक्काबुक्की अथवा गोंधळ घालणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागल्यामुळे सकाळपासूनच कोकण भवनच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे व अन्य पदाधिकारीदेखील सकाळपासूनच कोकण भवनच्या प्रवेशद्वाराजवळ हजर होते. पोलिसांनी काळे व त्यांच्या सहकार्यांना कोकण भवनच्या आत सोडले नाही.