नवी मुंबई : ४ नोव्हेंबर व ९ नोव्हेंबर २०१७ रोजी पनवेल येथे पार पडलेल्या मुंबई विभागीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये रा. फ. नाईक विद्यालयाचे एकूण ६ वयोगटा मध्ये पाच संघ अंतिम विजयी ठरले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुंबई विभागाचे नेतृत्व करणार आहेत.
या विभागात रायगड, ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगर तसेच विविध महानगरपालिकेच्या मातब्बर शाळेच्या संघांचा समावेश होता. या सर्वांवर मात करत रा. फ. नाईक विद्यालयाचे संघ अंतिम विजयी ठरले. एकाच शाळेचे एकाच वर्षी तीन वयोगटात पाच संघ म्हणजेच एकूण ६० खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणे हा एक नवीन विक्रम खो-खो मध्ये राज्यात प्रस्थापीत झाला आहे.
बीड व रत्नागिरी येथे रा. फ. नाईक विद्यालयाचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. या कामगीरीसाठी विविध माध्यमांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. १३ नोव्हेंबर २०१७ रोजी रा. फ. नाईक विद्यालय येथे या संघांचा सदिच्छा समारंभ पार पडला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आमदार संदीप नाईक यांनी खेळाडूंना शुभेच्छा देवून त्यांचे मनोबल उंचावले. तसेच समारंभाला नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, एक्सीस बँक कोपरखैरणेच्या व्यवस्थापिका सौ. सेन गुप्ता व श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश नाईक, प्राचार्य सुधीर थळे, प्रताप महाडीक सर व सौ. योजना तिगडे उपस्थित होत्या. सर्वांचे आता पुढील राज्यस्तरीय कामगिरीवर लक्ष लागले आहे.