नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील ऐरोली नोडमधील शिवसेना नगरसेवक संजू वाडे यांना २४ तासात दुसर्यांदा जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने पोलिसांपुढे पुन्हा एकवार आव्हान निर्माण झाले आहे.
गुरूवारी संध्याकाळी संजू आधार वाडे हे महापालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयात लोकांची कामे करत असतानाच ६.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना रवी पुजारी या नावाने धमकीचा फोन आला असून फोनवरील व्यक्ति आपण आस्ट्रेलियातून बोलत असल्याचे सांगत आहे. याप्रकरणी रबाले पोलिस ठाण्यात संजू वाडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
नगरसेवक संजू वाडे यांनी मोबाईलवर धमकीचा फोन आल्याने त्यांनी रबाले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संजु वाडे यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असून येत्या ४८ तासात संजु वाडे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना जीवे ठार मारण्याचे धमकीत म्हटले आहे. धमकीचे फोन येवूनही नगरसेवक संजू वाडे यांच्या दैनंदिन कार्यक्रमात कोणताही बदल झाला नाही. आज दिवसभर शिवसेनेकडून जुईनगर येथील बॅक ऑफ बरोडासमोर खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना नगरसेवक वाडे या आंदोलनातही काही काळ सहभागी झाले होते.
अवघ्या २४ तासात नगरसेवक संजू वाडे यांना दोन वेळा धमकीचे फोन आले आहेत. आज आलेल्या धमकीच्या फोनमध्ये येत्या ४८ तासात वाडे यांना त्यांच्या दोन मुलांसह उडविण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.