सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
महापालिका प्रशासनात काम करणारे सफाई कामगार, पाणी पुरवठा व मल:निस्सारण विभागातील कामगार, कचरा वाहतुक कामगार, उद्यान कामगार, मलेरिया कामगार, शिक्षण विभागातील कामगार आदी सर्वच कामगार उद्यापासून (सोमवार, दि. २० नोव्हेंबर) संपावर जाणार आहेत. हे कामगार कामावर हजर राहणार असले तरी कामबंद आंदोलन करणार आहेत.
वेतन फरकाची रक्कम, वेतन वाढ यासह अन्य प्रश्नांवर पालिका प्रशासन व सत्ताधारी चालढकल करत असल्याचा आरोप समाज समता कामगार संघ या कामगार संघटनेने केला आहे. याबाबत प्रशासन व सत्ताधार्यांशी चर्चा करून कामगारांना झुलवतच ठेवले जात असल्याचा आरोप कामगार संघटनेचे सचिव मंगेश लाड यांनी केला आहे.
दरम्यान, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी कामगारांना संपावर न जाण्याचे आणि नवी मुंबईकरांची अडवणूक न करण्याचे आवाहन केले आहे. कामगारांच्या समस्या सोडविण्याचे आपण पालिका प्रशासनाला निर्देश दिले असून कामगारांची कोणत्याही प्रकारची छळवणूक न करता त्यांना सुविधा देण्याचे निर्देश आपण ठेकेदारांना दिले असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले.