* ५०० पेक्षा जास्त युवक युवतींची उपस्थिती
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
कल्याण : तरुणांना रोजगार देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे मात्र नोकरीच्या मागे न लागता कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आणि सरकारच्या अनेक योजना आहेत त्यातून व्यवसायात आले पाहिजे. बेरोजगारी वाढत आहे त्यासाठी आज भव्य रोजगार मेळावा आयोजित करून जागेवरच तरुणांना पात्रतेनुसार नोकरी देण्याच्या निश्चयाने याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. आगामी काळात याहीपेक्षा मोठ्या संख्येने बेरोजगारी कमी करण्यासाठी कार्यक्रम आखले जातील असे मत भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी उद्घाटनादरम्यान बोलताना व्यक्त केले.
यावेळी कल्याण, टीटवाळा आणि परिसरातून पाचशेपेक्षा जास्त युवक युवतींनी या भव्य रोजगार मेळाव्याला उपस्थिती लावली होती. या रोजगार मेळाव्यात आयसीआयसीआय बँक, युरेका आउट सोर्सिंग सोल्युशन, होम रिवाईज, प्रोपर्टी सोल्युशन, आर्वटो, व्ही-ट्रान्स, रीलाइन्स जिओ, विप्रो आदी दहापेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला होता. सर्व युवक युवतींची मुलाखत दिवसभर पार पडली. पात्रतेनुसार त्यांना नोकरी दिली जाईल आणि ज्यांची निवड झाली नाही त्यांच्यासाठी पुढच्या टप्प्यात नोकरीसाठी निवड केली जाईल असेही आयोजकानी सांगितले.
आमदार नरेंद्र पवार यांनी आयोजित केलेला रोजगार मेळावा बेरोजगार युवकांना दिलासा देणारा आहे. नोकरीच्या संधी एकाच छताखाली निर्माण करून दिल्यामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्स्फुर्तपणे मोठ्या प्रमाणात या रोजगार मेळाव्याला उपस्थित तरुणांना आगामी काळातही रोजगार, व्यवसाय करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मदत केली जाईल असे मत भाजपा शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी नगरसेवक अर्जुन भोईर, सचिन खेमा, कल्याण शहर महिला अध्यक्ष पुष्पा रत्नपारखी, महिला आघाडी सरचिटणीस प्रिया शर्मा, सरचिटणीस सदा कोकणे, रितेश फडके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.