श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई :- नवी मुंबई महापालिका प्रशासनातील सफाई कामगारांनी सोमवारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखेरिला कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले खरे, पण दिवसभरात पालिका प्रशासनासह सत्ताधार्यांनी या संपाला गांभीर्याने घेतले नसल्याचे पहावयास मिळाले.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात विविध खात्यामध्ये ६७०७ कामगार कंत्राटी तत्वावर वर्षानुवर्षे काम करत आहेत. या कामगारांच्या कायम सेवेबाबत वारंवार आंदोलने होवूनही सत्ताधार्यांकडून केवळ आश्वासनेच प्राप्त झाली. परंतु या कामगारांची सेवा कायम न झाल्याने आजही या कामगारांना ठेकेदाराच्या हाताखाली कंत्राटी कामगार म्हणून काम करावे लागत आहे. या कामगारांना ‘समान कामाला समान न्याय’ या निकषाप्रमाणे कायम कामगारांप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय झाला. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी झालीच नाही. वेतन वाढीची घोषणा झाली खरी, पण गेल्या दोन वर्षापासून वेतनवाढीतील तफावतची रक्कम दिलेली नाही. यासह सफाई कामगारांसह अन्य कामगारांच्या समस्यांकडे पालिका प्रशासन आणि सत्ताधार्यांनी लक्ष दिले नाही. अखेरिला समाज समता कामगार संघ या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
सकाळी ६ वाजल्यापासून आंदोलन सुरू झाले आहे. हजेरी शेडवर कामगार आले, परंतु स्वाक्षरी मस्टरवर न करता हजेरी शेडच्या जवळच कामगार दुपारी ३ वाजेपर्यत बसूनच राहीले. अन्य संघटनांच्या सदस्यांनी मस्टरवर सही केली, परंतु काम सुरु न करता आंदोलनाला आपला पाठिंबा दिला. बेलापुर आणि कोपरखैराणे येथेही कचरा वाहतुक गाड्या आज बाहेर काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शहरातील कचरा उचलला गेला नाही. याशिवाय पंपावरील कामगारही संपात सहभागी झाल्याने मल:निस्सारण पाण्याचे शुध्दीकरण झाले नाही. दोन-तीन दिवस संप लांबल्यास शहरात साठलेल्या कचर्याची दुर्गंधी पसरेल तसेच मल:निस्सारणचे पाणी बाहेर न सोडल्यास हेच सांडपाणी गटारातून शहरात पसरेल अशी भीती आता नवी मुंबईकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आज दिवसभरात कामगार उत्स्फूर्तपणे संपात सहभागी झाले असले तरी प्रशासनाकडून व सत्ताधार्यांकडून या संपाची गांभीर्याने दखल घेण्यात न आल्याने संप तीव्र करण्याचा निर्धार आता कामगारांकडून व्यक्त केला जात आहे. महापौर जयवंत सुतार यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांना फोन करून चर्चेसाठी बोलविले तरी त्यांना इतरत्र मिटींगसाठी जावे लागल्याने चर्चा पुढे सरकलीच नाही. त्यामुळे उद्याही कामगार संपावर कायम राहणार असल्याचे चित्र आज सांयकाळीच स्पष्ट झाले.
समाज समता कामगार संघ या कामगार संघटनेचे सचिव मंगेश लाड हे पहाटे पाच वाजल्यापासून सफाई कामगारांचे हजेरी शेड, कोपरखैराणे व इतरत्र कचरा वाहतुक ठिकाणे, पालिका मुख्यालय, शाळा, रूग्णालय आदी ठिकाणीेॅ कामगारांच्या भेटीगाठी घेत त्यांना आंदोलनाचे महत्व पटवून देताना संपात एकजूट टिकविण्याचे आवाहन कामगारांना करताना दिवसभरातील घडामोडीदरम्यान पहावयास मिळाले.