नवी मुंबई :- मनसेने फेरीवाल्यांच्या विरोधात केलेले आंदोलन, दुबईतून मालाला कमी झालेली मागणी व आवकमध्ये झालेली वाढ या गोष्टी डाळींब उत्पादकांच्या मुळावर उठल्या आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये डाळींब अवघ्या २० रूपयापासून ते ८० रूपये किलो या दराने विकले जात आहे.
बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, पंढरपुर, बुलढाणा, नाशिक, सांगोला आदी भागातून डाळींब विक्रीला येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा डाळींबाची आवक विक्रीसाठी वाढली आहे. डाळींबाचे प्रमुख ग्राहक हे दुबई मार्केट आहे. यंदा दुबईतूनच मागणी कमी झाल्याने डाळींबाला स्थानिक बाजारपेठेचा आधार घ्यावा लागला आहे. आता मार्केटमध्ये १४० ते १६० पिकअप वाहनातून डाळींब विक्रीला येत आहे. डाळीब तीन दर्जात मोडले जात असून एक नंबरचे डाळींब ७० ते ८० रूपये किलो, दोन नंबरचे डाळींब ५० ते ६० रूपये किलो, तीन नंबरचे डाळींब २० ते २५ रूपये किलो दराने विकले जात आहे. दर्जा हा उत्पादनाचा नाही तर वजनावर निश्चित होतो. दुबईतील बाजारपेठेत डाळींब आपल्यापेक्षाही स्वस्त भावाने विकलेे जात आहे. त्यातच गेल्या महिन्यापासून फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने सुरू केलेल्या आंदोलनाचा संपूर्ण फळ मार्केटलाच फटका बसला असून किमान ३० ते ३५ टक्के ग्राहक मार्केटकडे फिरकत नसल्याने माल तसाच पडून राहत आहे. माल खराब होवू नये म्हणून येईल त्या ग्राहकाला मिळेल त्या भावाने फळे विकावी लागत आहे. डाळींब घेवून आलेल्या शेतकर्याला उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.