नवी मुंबईतील प्रदुषणावर नियंत्रण ठेवा
नवी मुंबई : गेल्या तीन वर्षात नवी मुंबई शहरातील पाणी आणि हवेच्या प्रदुषणात वाढ झाली असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाची(एमपीसीबी) आहे. मात्र हे बोर्ड अंग झटकताना दिसते. त्यामुळे बोर्डाच्या अधिकार्यांनी प्रामाणिकपणे आपले काम करुन प्रदुषणकारी कंपन्यांवर कारवाई करावी, या शब्दात आमदार संदीप नाईक यांनी एमपीसीबीच्या अधिकार्यांना खडसावले.
गेल्या काही दिवसांत आमदार नाईक यांच्याकडे रहिवासी भागात प्रदुषण वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी मंगळवारी लोकप्रतिनिधींसमवेत पावणे एमआयडीसी आणि येथील रासायनिक पाण्यावर प्रक्रीया करणार्या प्रकल्पाची(सीएटीपी) पाहणी केली. आमदार नाईक म्हणाले की, एमआयडीसी भागात सुमारे ३५०० कारखाने आहेत. या सर्वच कारखान्यांमधून निघणार्या रासायनिक पाण्यावर सीएटीपीमध्ये प्र्रक्रीया होेतेच असे नाही. अनेक कंपन्या त्यांचे प्रक्रीया न केलेले पाणी थेट नाल्यात सोडतात. आणि पाणीप्रदुषण करतात. हवेच्या प्रदुषणाचे देखील असेच आहे. रात्री १० नंतर नवी मुंबईच्या वातावरणात प्रदुषणकारी धुर अच्छादलेला असतो. बोलण्यास तोंड उघडले तरी श्वासोश्वासास त्रास होतो. रात्रभर या प्रदुषणकारी धुळ-धुक्याचा किती विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. एमपीसीबीने वरचेवर आणि वेळेवर जर कंपन्यांची तपासणी करुन प्रदुषण करणार्या कारखान्यांवर कारवाईचा बडगा उभारला तर निश्चितच प्रदुषणाला आळा बसले मात्र एमपीसीबी प्रदुषण आहे हे मान्यच करीत नसेल तर पुढील कारवाईचा विषयही थांबतो. प्रदुषणाबाबत लोकप्रतिनिधींनी ओरड केली की नावादाखल हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही कंपन्यांवर कारवाई करुन आपले कर्तव्य पार पाडल्याच्या अर्विभावात एमपीसीबीचे अधिकारी असतात, या बददल आमदार नाईक यांनी संताप व्यक्त केला. आमदार नाईक यांच्या पाहणीदौर्यात एमपीसीबीच्या अधिकार्यांनी येत्या ४ डिसेंबर पर्यत प्रदुषणकारी कंपन्यांचा अहवाल त्यांना देण्याचे मान्य केले आहे. परंतु ४ डिसेंबर पर्यत हा अहवाल प्राप्त झाला नाही तर एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांच्या पाण्याचे नमुणे स्वतः गोळा करुन हे नमुणे एखाद्या वरिष्ठ पातळीवरील संस्थेकडून तपासण्यात येतील, असा इशारा आमदार नाईक यांनी एमपीसीबीला दिला. या नमुण्यांच्या अहवालात जर प्रदुषण होत असल्याचे निष्पन्न झाले तर मात्र संबधीत अधिकार्यांवर कडक कारवाईसाठी पावले उचलण्यात येतील, असे देखील आमदार नाईक म्हणाले. गेल्या तीन वर्षात औद्योगिक पटटयात अनेक रासायनिक कंपन्यांना मुदतवाढ देण्यात आली अशी माहिती देवून कंपन्या बंद करुन कामगारांना बेरोजगार करा, असे आम्ही कधीच म्हणणार नाही. मात्र कंपन्यांतून होणार्या प्रदुषणाला आळा घालून रहिवाशांच्या आरोग्यावर प्रदुषणाचा घातक परिणाम होणार नाही, याची काळजी एमपीसीबीने घ्यायलाच हवी, असे आमदार नाईक म्हणाले. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी बगिचे, जॉगिंग ट्रॅक आदींची निर्मिती आम्ही करतो परंतु प्रदुषणामुळे विकार उदभवत असतील तर या हिरवाईचा काहीही उपयोग नसल्याची खंत आमदार नाईक यांनी बोलून दाखविली. प्रदुषणामुळे नवी मुंबईतील विविध पालिका तसेच खाजगी रुग्णालयात किती आजारी नागरिक उपचार घेत आहेत याची आकडेवारी गोळा करण्याची सुचना आमदार नाईक यांनी पालिकेच्या आरोग्य समितीच्या सभापती उषा भोईर यांना केली आहे. जेणेकरुन शहरात प्रदुषणाचे प्रमाण किती आहे याची कल्पना येईल.
पालिकेच्या पर्यावरण आण्ि तदर्थ समितीच्या सभापती नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी देखील एमपीसीबीमधील अधिकार्यांच्या हलगर्जीपणाबददल टिका केली. जर अधिकारी प्रदुषण नाही असे म्हणत आहेत तर नागरिकांना श्वासोश्वासाचे आणि इतर आजार का होत आहेत? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवाल त्यांनी केला. अनेक कंपन्या प्रक्रीया न करता त्यांच्या कारखान्यांमधून निघालेले पाणी थेट नाल्यात सोडतात. अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात कारण अधिकारी आणि अशा कंपन्यांचे साटेलोटे आहे, असा आरोपही नगरसेविका गायकवाड यांनी केला. शहरातील प्रदुषणाबाबत आमदार नाईक यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात विषय उपस्थित करावा, अशी विनंती देखील नगरसेविका गायकवाड यांनी केली आहे.
मंगळवारच्या पाहणीदौर्याप्रसंगी आमदार नाईक यांच्यासोबत पालिकेच्या आरोग्य समितीच्या सभापती उषा भोईर, पलिकेच्या पर्यावरण तदर्थ समितीच्या सभापती दिव्या गायकवाड, नगरसेवक मुनावर पटेल, नगरसेविका मनिषा भोईर, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक वैभव गायकवाड, शशिकांत भोईर, समाजसेवक पुरुषोत्तम भोईर आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. एमपीसीबीच्या वतीने तानाजी यादव, केतन पाटील, उदय यादव, उमेश जाधव आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावणे एमआयडीसी येथील आलोक टेक्सटाईल कंपनीयेथून या पाहणीदौर्यांची सुरुवात झाली. येथील नाल्याची, कंपन्यांची आणि त्यानंतर आमदार नाईक यांनी सीएटीपी प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर या दौर्यांची सांगता झाली.