नवी मुंबई, : बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेत दरोडेखोरांनी भ्ाुयार खणून बँकेच्या ग्राहकांचे लॉकर लुटले. सर्वसामान्य खातेधारकांची कष्टाची कमाई रातोरात गायब झाली. या लॉकरधारकांनी सोमवारी लोकनेते गणेश नाईक यांची भेट घेवून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
बँकेच्या निष्काळजीपणामुळे १३ नोव्हेंबर रोजी हा दरोडा पडल्याचे लॉकरधारकांचे म्हणणे आहे. ३० लॉकर फोडून त्यामध्ये ठेवलेले मौल्यवान ऐवज आणि आयुष्यभराची कमाई दरोडेखोर घेवून गेले. आमचे ऐवज आणि पैसे कधी मिळतील, हे विचारण्यासाठी आम्ही गेले आठ दिवस बँक व्यवस्थापन आणि पोलिसांकडे चपला झिजवत आहोत मात्र आम्हाला कुठलेही सहकार्य मिळत नाही, असे या खातेदारांचे म्हणणे आहे. अखेर या सर्व खातेदारांनी लोकनेते नाईक यांची भेट घेतली आणि याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.
लोकनेते नाईक यांनी तातडीने पोलीस उपायुक्तांशी या विषयावर चर्चा केली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खातेदारांना त्यांचा मुद्देमाल लवकरच मिळेल, अशी आशा व्यक्त केली. चोरीस गेलेला ऐवज कमी प्राप्त झाल्यास खातेदारांसह बँकेसोबत लढा देवू. खातेदारांना या प्रकरणी नक्कीच न्याय मिळवून देवू, अशी ग्वाही लोकनेते नाईक यांनी दिली. लोकनेते नाईक यांना भेटण्यास गेलेल्या खातेदारांमध्ये प्रविण ठाकुर, विकास अग्रवाल, महादेव करकरे, दत्तात्रय गव्हाणे, तन्वी तोडाई, सुदेश उतुरकर, शिला गाडगे अशा सर्वच पिडीत खातेदारांचा समावेश होता.