नवी मुंबई : मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या कंत्राटी कामगारांच्या संपाबाबत आज लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या कंत्राटी कामगारांच्या संघटना प्रमुखांशी चर्चा करत समाधानकारक मार्ग काढल्याने आजपासून कंत्राटी कामगारांचा संप मागे घेण्यात आला असून नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. यावेळी माजी महापौर सागर नाईक, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक सुरज पाटील, परिवहन समिती सदस्य राजू शिंदे उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विषयक काम करणा-या 91 ठेकेदारांकडे काम करणा-या कंत्राटी सफाई कर्मचा-यांच्या किमान वेतनाचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी तसेच इतर विभागातील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाचा प्रस्तावही येत्या स्थायी समितीच्या पटलावर आणण्यात आला असून त्याचीही त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी असे महापौरांनी महापालिका प्रशासनास निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे या कंत्राटी कामगारांची थकबाकीही लवकरात लवकर देणेबाबत सूचीत केले.
घनकचरा वाहतुक करणा-या गाडयांवरील चालक व क्लिनर यांनाही ठेकेदाराने किमान वेतन देणे गरजेचे असून याबाबत महापालिका आयुक्त यांनी समिती स्थापन केली असून या समितीने अनुषांगिक सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेऊन या कामगारांना दिलासा द्यावा असेही महापौरांनी सूचीत केले आहे.
शहराची स्वच्छता राखणा-या पर्यायाने शहराचे आरोग्य सांभाळणा-या कंत्राटी स्वरुपातील सफाई कामगारांबाबत तसेच इतरही विभागात कंत्राटी स्वरुपात काम करणा-या कामगारांबाबत आमची सकारात्मक भूमिका असून या कंत्राटी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सतत आपल्यासोबत आहोत अशा प्रकारे महापौर जयवंत सुतार यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वासित केले. त्यानंतर कामगार संघटनांचे प्रमुख मंगेश लाड, गजानन भोईर, सुनील पटेकर तसेच इतर कामगार प्रतिनिधी यांनी हा कंत्राटी कामगारांचा संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.