नवी मुंबई : किमान वेतन मिळावे तसेच या किमान वेतनाची थकबाकी मिळावी यासाठी नवी मुंबई पालिकेतील कंत्राटी कामगारांनी दोन दिवस सुरु ठेवलेला संप मंगळवारी अखेर मागे घेतला. कष्टकरी कामगारांवर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देत लोकनेते गणेश नाईक यांनी त्यांना या प्रश्नी भेटण्यास गेलेल्या कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पालिकेतील पदाधिकार्यांना या संदर्भात आवश्यक सूचना केल्या.
लोकनेते नाईक यांच्या भेटीनंतर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पालिका मुख्यालयातील महापौर जयवंत सुतार यांच्या दालनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कंत्राटींच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला माजी महापौर सागर नाईक, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षप्रतोद डॉ.जयाजी नाथ, नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सुरज पाटील, सभापती नेत्रा शिर्के, परिवहन समिती सदस्य राजू शिंदे, समाज समता कामगार संघांचे सरचिटणीस मंगेश लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.नाईक यांनी कंत्राटींच्या प्रतिनिधींशी यशस्वी बोलणी केली. एकीकडे कंत्राटींना न्याय मिळाला पाहिजे तर दुसरीकडे कचराकोंडीचा त्रास सर्वसामान्य नवी मुंबईकरांना होवू नये यासाठी संपकरी कामगारांच्या प्रतिनिधींशी बोलणी करण्यात आली. कष्टकरी सफाई कर्मचारी आणि इतर कर्मचार्यांमुळे नवी मुंबईने स्वच्छ भारत अभियानात धवल यश संपादित केले आहे. लोकनेते गणेश नाईक यांनी या कंत्राटी कामगारांना त्यांच्या पश्रिमाचा योग्य मोबदला मिळावा याची सदैव काळजी घेतलेली आहे. समान कामास समान वेतन देण्याचा ठराव करणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने कंत्राटी कामगारांसाठी किमान वेतनाचा कायदा केल्यावर किमान वेतनाचा ठराव तातडीने पालिकेत मंजुर करण्यात आला. किमान वेतन कायद्याची आणि त्या अंतर्गत कंत्राटींना देय थकबाकी अदा करणेविषयी महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक आणि ठोस पावले उचलण्यात आली. त्यानंतर कंत्राटींनी संप मागे घेतला, संप मागे घेण्याचे जाहिर करुन त्यांनी लोकनेते गणेश नाईक, डॉ.संजीव गणेश नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक आदी सर्वांचे आभार मानले. कष्टकरी कंत्राटींच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी लोकनेते गणेश नाईक यांनी वेळोवेळी ठाम भूमिका घेतली आहे. किमान वेतनाबाबत देखील त्यांनीच आम्हाला न्याय मिळवून दिला आहे.अशी प्रतिक्रीया समाज समता कामगार संघाचे उपाध्यक्ष गजानन भोईर यांनी दिली. याविषयी महापौर सुतार यांनी अधिक माहिती दिली. कंत्राटींना किमान वेतनाची थकबाकी देण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या किमान वेतनाचा आढावा घेण्यासाठी कॅफो, अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापाल आणि लेखापरिक्षक या चौघांची एक समिती नेमण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विषयक काम करणार्या ९१ ठेकेदारांकडे काम करणारर्या कंत्राटी सफाई कर्मचारर्यांच्या किमान वेतनाचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच इतर विभागातील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाचा प्रस्तावही येत्या स्थायी समितीच्या पटलावर आणण्यात आला असून त्याचीही त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, असे महापौरांनी महापालिका प्रशासनास निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे या कंत्राटी कामगारांची थकबाकीही लवकरात लवकर देणेबाबत सूचित केले. घनकचरा वाहतूक करणार्या गाडयांवरील चालक व क्लिनर यांनाही ठेकेदाराने किमान वेतन देणे गरजेचे असून याबाबत महापालिका आयुक्त यांनी समिती स्थापन केली असून या समितीने अनुषंगिक सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेऊन या कामगारांना दिलासा द्यावा, असेही महापौरांनी सूचित केले आहे.शहराची स्वच्छता राखणार्या पर्यायाने शहराचे आरोग्य सांभाळणारर्या कंत्राटी स्वरुपातील सफाई कामगारांबाबत तसेच इतरही विभागात कंत्राटी स्वरुपात काम करणार्या कामगारांबाबत आमची सकारात्मक भूमिका असून या कंत्राटी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सतत आपल्यासोबत आहोत, अशा प्रकारे महापौर सुतार यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वासित केले.