पोलीस आयुक्तांना भेटले राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ
नवी मुंबई : बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेतील सर्वसामान्य खातेदारांचे लॉकर फोडून दरोडेखोरांनी त्यांची कमाई पळवली आहे. लॉकरमधून लंपास केलेले दागिणे आणि रक्कम आरोपींकडून जप्त करुन ते खातेदारांना लवकरात लवकर परत करावे, अशी मागणी नवी मंुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, ज्येष्ठ नगरसेवक अशोक गावडे, पालिकेतील प्रतोद डॉ.जयाजी नाथ, नगरसेविका संगीता बोर्हाडे, तालुकाअध्यक्ष गणेश भगत, परिवहन समितीचे माजी सभापती साबू डॅनियल यांच्यासह बँकेच्या पिडीत खातेदारांनी पोलीस आयुक्त नगराळे यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले. बडोदा बँकेत कोणतीही सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नव्हती. सीसीटिव्ही यंत्रणा नव्हती. ही गंभीर बाब असल्याचे डॉ.नाईक यांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. नवी मुंबईत अनेक नामांकित बँका आहेत. पतसंस्था आहेत. भविष्यात अशा प्रकारची लुटीची घटना घडू नये यासाठी बॅकांना सुरक्षेचे कठोर उपाय योजण्याचे निर्देश द्यावेत. त्याचबरोबर पोलीसांचेही अस्तित्व जाणवावे यासाठी बिट चौक्या आणि बिट मार्शल यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची मागणी डॉ.नाईक यांनी केली. पोलीस आयुक्त नगराळे यांनी बडोदा बॅकेवरील दरोडयाच्या तपासाविषयी माहिती शिष्टमंडळाला दिली. पोलीस या गुन्हयाचा शिताफिने तपास करीत असल्याबददल शिष्टमंडळाने त्यांचे अभिनंदन केले. बॅकेेच्या सर्वसामान्य खातेदारांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुतार यांनी याप्रसंगी केली.
बॅकांप्रमाणेच एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा मुददा देखील डॉ.संजीव गणेश नाईक यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासोबतच्या बैठकीत उपस्थित केला. प्रत्येक एटीएम सेंटरमध्ये सीसीटिव्ही यंत्रणा आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या सुचना बँकांना देण्याची मागणी केली. नवी मुंबईत यापूर्वी एटीएम सेंटर लुटीच्या घटना देखील घडल्या आहेत.