श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई :- दिव्यांग मुले आणि व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सेवाभावी कार्य करणारी संस्था म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या इ.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राचा राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव होत असून यामध्ये केंद्र शासनाचा सन 2017 मधील ‘सर्वोत्कृष्ट संस्था राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाल्याने आणखी एक मानाचा तुरा नवी मुंबई महानगरपालिकेच्या लोककल्याणकारी कार्यात खोवला गेला आहे.

यापुर्वी मा. पंतप्रधान पुरस्काराप्रमाणेच अनेक राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी नावाजले जाणारे इ.टी.सी. केंद्र एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारे देशातील एकमेव केंद्र असल्याची प्रशंसा अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरावरील मान्यवरांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांनी केलेली आहे.
यामध्ये आता केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय स्तरावरील मानाचा सर्वोत्कृष्ट संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने लक्षणीय भर पडलेली आहे. सन 1969 पासून केंद्र सरकारकडून दिव्यांग व्यक्ती व त्यांच्यासाठी कार्य करणा-या संस्था यांना प्रेरणा देण्यासाठी असे पुरस्कार 14 विविध श्रेणींमध्ये वितरीत करण्यात येतात. यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणारी सर्वोत्कृष्ट संस्था, उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी, दिव्यांगांसाठीचे रोल मॉडेल, तसेच दिव्यांगांसाठी संशोधन करणा-या संस्था अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.03 डिसेंबर 2017 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे मा. राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर व आयुक्त या मानांकीत राष्ट्रीय पुरस्काराचा स्विकार करणार आहेत.
इ.टी.सी. केंद्राला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव वाढविणारा असून समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब असल्याचे नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी सांगितले आहे.
महापालिका आयु्क्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत इ.टी.सी. केंद्राच्या लोककल्याणकारी कामाची दखल लोकांप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावर केंद्र शासन पातळीवरही घेतली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लवकरच इ.टी.सी. केंद्राचा विस्तार करीत नवीन उपकेंद्रही सुरु करण्यात येत असल्याचे सांगत त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. पनवेल महानगरपालिका, ओरिसा राज्य व इतर ठिकाणीही दिव्यांगांच्या कल्याणासाठी अशी केंद्र सुरू करणेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या इ.टी.सी. केंद्रामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.