श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महापालिकेने अर्धवट अवस्थेत कारवाई करून सोडून दिलेल्या बेकायदा इमारतींच्या झालेल्या पुनर्बांधणीप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी घणसोली विभागाचे अधीक्षक चंद्रकांत बंडगर आणि कनिष्ठ अभियंता महेश बाविस्कर या दोन अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
कोणत्याही परिस्थितीत शहरात बेकायदा बांधकामांना थारा देणार नाही, असा संदेश आयुक्तांनी यातून दिला असल्याने नवी मुंबईतील भूमाफियांचेही धाबे दणाणले आहे. बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणार्या अधिकार्यांचीही गय केली जाणार नाही, असा इशाराच यातून आयुक्तांनी दिला आहे.
२०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदा बांधकामांवर धडाकेबाज कारवाई करून भूमाफियांना सळो की पळो’ करून सोडले होते. तुकाराम मुंढे यांची पुण्याला राज्य सरकारने बदली केल्यानंतर मात्र, नंतरच्या काळात अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई धीम्या गतीने सुरू झाल्याने भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली होती.
प्रशासनाचा वचक कमी झाल्याने कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, ऐरोली, शहाबाज या गावांतील अर्धवट पाडलेल्या बेकायदा इमारतींची पुनर्बांधणी करण्यास भूमाफियांनी सुरुवात केली होती. त्याची दखल घेत रामास्वामी यांनी अधिकार्यांची झाडाझडती घेतली. शहरात एकीकडे कारवाई सुरू असताना आधी केलेल्या कारवाईबाबत उदासीनता का, असा जाब त्यांनी पालिका अधिकार्यांना विचारला.
घणसोली, गोठीवलीसह इतर इमारतींवर केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर या प्रकरणी घणसोली विभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता व अधीक्षक यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित केले.
नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी ज्या स्थानिक ग्रामस्थांनी, प्रकल्पग्रस्तांनी योगदान दिले, त्यांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना अतिक्रमण घोषित करण्यात येत आहे, भूमीपुत्रांची घरे नियमित होत नाही. गावठाणामध्ये बांधलेल्या घरांना, इमारतींना पाणीपुरवठा पालिका प्रशासन करत नसले तरी अनधिकृतपणे बांधलेल्या चाळींच्या परिसरात पाणी, शौचालय यासह अन्य नागरी सुविधा पालिका प्रशासन उपलब्ध करून देत आहे, ही या शहरासाठी आणि येथील स्थानिक ग्रामस्थांसाठी मोठी शोकांतिका आहे.