श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये जुईनगर, मानखुर्द, ठाणे, कल्याण, भिवंडी तसेच ठाणे ग्रामीण भागातील रेल्वे रूळालगत नाल्यातील सांडपाण्यावर पिकविली जाणारी भाजी विकण्यास येत आहे. या भाजीला वाढीची भाजी असे संबोधले जाते. ही वाढीची भाजी गवताच्या काड्यानी बांधलेली असते. परंतु नवी मुंबई लाईव्हमध्ये याबाबतचे सविस्तर वृत्त प्रकाशित झाल्यावर वाढीची भाजी उत्पादकांनी आता या पालेभाज्याही सुतळीने बांधून मार्केटमध्ये विक्रीला आणण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या भाज्या ओळखणे आता अवघड झाले असल्याचे खुद्द मार्केटमधील विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
तथापि ग्रामीण भागाच्या तुलनेत फ्रेश असणार्या भाज्या हीच एकमेव या वाढीच्या भाजीची ओळख राहीली आहे. वाढीची भाजी ओळखणे अवघड झाल्याने आपल्या जेवणात आता कोणत्या भागातील भाजी आली आहे हे कोणालाही समजणे अवघड आहे. सांडपाण्यावर पिकविल्या जाणार्या भाज्यांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती कायम आहे.
मार्केटमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे. वाढीच्या भाज्यांमध्ये पालेभाज्यांचाच समावेश असतो. आता मार्केटमध्ये सर्वच भाज्या सुतळीने बांधलेल्या असल्याने ग्राहकाला दूषित पाण्यावर पिकविल्या जाणार्या भाज्या ओळखणे कायमचेच अवघड होवून बसले आहे.