नवी मुंबई : नवी मुंबईचा आधुनिक शहर म्हणून नावलौकीक असताना येथील अत्याधुनिक प्रकल्प, सौंदर्यस्थळे, सण – उत्सव, संस्कृती, पर्यावरण, विविध उपक्रम अशा विविध बाबी व्यावसायिक छायाचित्रकारांप्रमाणेच हौशी छायाचित्रकारांनाही भूरळ घालताना दिसतात. अशा प्रकारे नवी मुंबईतील वैशिष्टयपूर्ण गोष्टींचे नितांतसुंदर दर्शन घडविणा-या छायाचित्रांचे एकत्रितपणे दर्शन घडावे, तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक तसेच हौशी छायाचित्रकारांच्या छायाचित्रण कलेला प्रोत्साहीत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मागील वर्षीप्रमाणेच “प्रतिमा – नवी मुंबईची, छायाचित्रण स्पर्धा 2017-18” आयोजित कऱण्यात येत आहे.
स्पर्धेमध्ये व्यावासयिक आणि हौशी असे दोन स्वतंत्र गट असून सहभागाकरिता कोणत्याही प्रकारचे प्रवेशशुल्क नाही. स्पर्धक हा दिघा ते सी.बी.डी. बेलापूर या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असावा व त्याने काढलेले छायाचित्रदेखील याच कार्यक्षेत्रातील असणे आवश्यक आहे. स्पर्धेकरीता छायाचित्रकार आपल्या कॅमेराने टिपलेली, सौंदर्य व मूल्यांची जपणूक करणारी सर्वोत्तम पाच छायाचित्रे (Best of Navi Mumbai) स्पर्धेकरीता पाठवू शकतात, मात्र त्यामध्ये किमान दोन छायाचित्रे ही नवी मुंबई महानगरपालिका प्रकल्पांची असायला हवीत. छायाचित्रकाराने अर्जासोबत 8 X 12 आकारातील प्रत्येक रंगीत छायाचित्राची एक मॅट फोटो प्रिंट आणि हाय रिझॉलेशन फोटोची सीडी देणे आवश्यक आहे.व्यावसायिक छायाचित्रकारांच्या गटाकरीता रु.20 हजार रक्कमेची 8 पारितोषिक तसेच हौशी छायाचित्रकारांच्या गटाकरीता रु.10 हजार रक्कमेची 4 पारितोषिके स्मृतीचिन्हांसह प्रदान केली जाणार आहेत.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज महानगरपालिकेची सर्व आठ विभाग कार्यालये, विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी, क्रीडा व सांस्कृतिक विभाग सेक्टर 3 सी.बी.डी. बेलापूर याठिकाणी तसेच महानगरपालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in यावर उपलब्ध आहेत. छायाचित्रांसह अर्ज सादर कऱण्याची अंतिम तारीख दिनांक 8 डिसेंबर 2017 असून अर्ज दाखल करताना केवळ क्रीडा व सांस्कृतिक विभाग कार्यालय, स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर 3, सी.बी.डी. बेलापूर येथेच योग्य आकारातील छायाचित्रांसह मोठ्या आकाराच्या लिफाफ्यात “मा.आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका” यांच्या नावे लिफाफ्याच्या डाव्या कोप-यात वरील बाजूस “प्रतिमा – नवी मुंबईची छायाचित्रण स्पर्धा याकरीता” असे नमूद करून द्यावयाचे आहेत. अधिक माहितीकरीता छायाचित्रकार 27573294 / 9320307222 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक तसेच हौशी छायाचित्रकारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या स्पर्धेव्दारे मागील काही वर्षांपासून सातत्याने एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून स्पर्धेतील सर्वोत्तम छायाचित्रांना नवी मुंबई महानगरपालिकेची आगामी वर्षाची दिनदर्शिका 2018 मध्ये प्रसिध्दी देण्याचा मनोदय आहे. तरी नवी मुंबई शहराची आकर्षक प्रतिमा साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांनी या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. विशाल डोळस यांच्या वतीने कऱण्यात येत आहे.