जयदिप पाटील / ऐरोली
गणेशोत्सव २०१७ दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही मंडळानी मंडप परवानगी अर्ज प्रलंबित असताना व महानगरपालिकेने परवानगी देण्याअगोदर मंडपाची उभारणी सुरु केल्याचे आढळून आले होते. या बाबीची गंभीर दखल घेत मा. उच्च न्यायालयाने दि. १०, ११, १२ व १६ ऑगस्ट २०१६ रोजी आदेश दिले असून त्याची सक्त अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
यादृष्टीने सर्व गणेशोत्सव, नवरात्रौत्सव मंडळे व अन्य नागरिक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करु नये, तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरुन मंडपाची उभारणीही सुरु करु नये. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपावर निष्कासनाची कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावयाची आहे.
सर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणारी मंडळे, संस्था, नागरिकांनी मंडप उभारणी परवानगी अर्ज उत्सव प्रारंभ दिनांकाच्या किमान एक महिना अगोदर महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे सादर करावेत व लेखी परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी करु नये. विशेषत्वाने उत्सव सुरु होण्याच्या दहा दिवस अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत किंवा मंडप उभारण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही याची गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळानी नोंद घ्यावयाची आहे.
या संदर्भात मा. उच्च न्यायालयाने मंडप उभारणीसाठी दिलेल्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी व त्याविषयी माहिती देण्याकरीता दिनांक 28 नोव्हेंबर 2017 रोजी, सकाळी 11 वाजता, नवी मुंबई महानगरपालिका नविन मुख्यालय इमारतीतील तिस-या मजल्यावरील ज्ञानकेंद्र, सेक्टर-१५ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळे तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.