पनवेल: पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नियोजित इमारतीला आज मुहूर्तस्वरूप देण्यात आले. सुसज्ज आणि सर्वांगसुंदर इमारतीचा आराखडा मंजूर करण्यात आला. आयटीआय पूनर्विकास समितीची आढावा बैठक कौशल्य, विकास विभागाचे राज्य संचालक अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथे संपन्न झाली. त्यावेळी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
समितीचे सचिव, प्राचार्य बी. व्ही. फडतरे, सदस्य आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, उपाध्यक्ष माधुरी गोसावी, पराग बालड, सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागीय अभियंता एस. एम. कांबळे, उपअभियंता एस. एम. डांगे, आयटीआयच्या राज्य निरीक्षक ज्योती लोहार, प्रबंधक माधुरी शिंदे, एस. जे. पाटील, चंद्रकांत शिर्के, मंगल भारवाड, अँड. संतोष सरगर, शैलेश चौधरी, अमित चावले, मनहर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
नव्या इमारतीसह वसतिगृहाची इमारत बांधण्यात येणार आहे. विश्रामगृह, कँटीन, स्टाफ रूम, लिफ्टची व्यवस्था, चार माजली इमारत आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. अडीच हजार विद्यार्थ्यांना सामावून घेणारी अत्याधुनिक इमारत उभारण्याच्या दृष्टीने आज बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आला.
राज्याचे मुख्य स्थापत्य अभियंता यांची भेट घेण्याची जबाबदारी मुख्य निरीक्षक ज्योती लोहार यांच्यावर सोपविण्यात आली. पुणे आणि मुलुंडच्या आयटीआयच्या देखण्या इमारतीच्या धर्तीवर इमारत बांधायला हवी, असे सांगत पुढील बैठकीच्या अगोदर पूर्ण खर्चाचा आढावा आणि प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी कांबळे व डांगे यांनी स्वीकारली. पुणे येथील संस्थेची माहिती आणि नकाशे प्राप्त करण्यासाठी परदेशी यांनी पुढाकार घेतला. पनवेल कोर्टात रखडलेल्या अतिक्रमण प्रकरणाची जबाबदारी वडेर यांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्ताकडे जावून त्यांच्याशी याबाबतीत चर्चा करण्याचे सर्वाधिकार प्राचार्य फडतरे यांना देण्यात आले.
सध्या पनवेल आयटीआयमध्ये सुरू असलेल्या ट्रेडमध्ये वाढ करून कुशल कामगारांसाठी लागणाऱ्या महत्वाच्या ट्रेडचा समावेश करावा,अशी मागणी कांतीलाल कडू यांनी केली. त्याप्रमाणे आणखी दहा ट्रेड वाढविण्यात येतील, असे अनिल जाधव यांनी सांगितले.
येत्या पंधरा दिवसात पुढील सोपस्कार पूर्ण करून त्याचा आढावा पुढच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. बैठकीनंतर संस्थेच्या आवरात कल्पवृक्षाची झाडे लावण्यात आली.